लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सरकार काँग्रेसचे असो की भाजपाचे त्यांनी विदर्भातील जनतेला दिलेली आश्वासने कधील पाळले नाही. त्यामुळे विदर्भाचा बॅकलॉग वाढला. भाजपने तर विदर्भाचा ठराव घेऊन त्याकडे पाठ फिरविली. विदर्भाचा बॅकलॉग आणि राजकीय पक्षांची फसवी आश्वासने याबाबत जनतेमध्ये जनजागृती करून, येणाऱ्या निवडणुकीत इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत सशक्त पर्याय देण्यासाठी सर्व विदर्भवादी संघटना आणि पक्षांनी महामंचची निर्मिती केली आहे. यापुढे होणाऱ्या सर्व निवडणुका विदर्भासाठी आंदोलन म्हणून लढण्यात येईल, असे सूतोवाच विदर्भ राज्य आघाडीचे अध्यक्ष अॅड. श्रीहरी अणे यांनी केले.विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे वेगळ्या विदर्भासाठी जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी विदर्भ राज्य निर्माण यात्रेला बुधवारपासून सुरुवात झाली. यात्रेला हिरवी झेंडी दाखविण्यासाठी अॅड. श्रीहरी अणे उपस्थित होते. २ ते १२ जानेवारी दरम्यान पूर्व आणि पश्चिम विदर्भात ही यात्रा फिरणार आहे. बुधवारी व्हेरायटी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून यात्रेला सुरुवात झाली. यावेळी आम आदमी पार्टीचे ब्रिगेडियर सुधीर सावंत, विदर्भ माझाचे राजकुमार तिरपुडे, जांबुवंतराव धोटे विचार मंचचे सुनील चोखारे, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे सदस्य अॅड. वामनराव चटप, मुख्य निमंत्रक राम नेवले, प्रबीरकुमार चक्रवर्ती, श्रीनिवास खांदेवाले, अरुण केदार, विजया धोटे, अॅड. संजय नेरकर, अॅड. वीणा मूल, दिलीप नरवडिया, रमेश गजबे, अशोक मिश्रा, बसंत चौरसिया, पूर्णिमा भिलावे, शेखर रोकडे, अशोक मिश्रा, पुरुषोत्तम खराळकर, गणेश शर्मा, देवेंद्र वानखेडे, श्रीकांत तरार, राजू नागुलवार, जगजितसिंग, कविता सिंगल, सुनंदा खैरकर, नूतन रेवतकर, प्रीती देडमुठे, विद्या खरडकर, प्राजक्ता भेलकर, अर्चना एलकुंचवार, डी.ओ. म्हैमाने, घनश्याम पुरोहित आदी उपस्थित होते. विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात ही यात्रा जाणार असून, तिथे बैठका आणि सभेच्या माध्यमातून जनजागृती करणार आहे. यात्रेचा समारोप १२ जानेवारी रोजी नागपुरात होणार आहे. समारोपात सर्व विदर्भवादी संघटना आणि पक्षाचे पदाधिकारी एकत्र येणार आहे आणि येणाऱ्या निवडणुकीचा बिगुल फुंकणार आहे.