लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंदिरा माता नगरात राहणारा अट्टल गुन्हेगार भोकण्या उर्फ राहुल काशिनाथ आकोडे (२८) याला अटक करून एमआयडीसी पोलिसांनी त्याच्याकडून ११ तोळे सोन्याचे दागिने आणि १०० ग्रॅम चांदी असा एकूण चार लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कुख्यात भोकण्या माकोडे हा अट्टल गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध चोरी, घरफोडीचे २५ पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. कोणताही साथीदार सोबत न ठेवता तो एकटाच गुन्हे करतो. काही दिवसांपूर्वी पप्पू गोविंदराव ठाकरे यांच्याकडे घरफोडी झाली होती. त्यात सोन्याचे मंगळसूत्र, अंगठी, चांदीचा कंबरपट्टा, पायपट्ट्या, तोडा असा लाखोंचा ऐवज चोरीला गेला होता. या गुन्ह्याची तक्रार मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी तपास सुरू केला. त्याच भागात राहणाऱ्या भोकण्या उर्फ राहुल आकोडे याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याने या गुन्ह्याची कबुली दिली. शिवाय यापूर्वी तीन महिन्यांत त्याने एकात्मता नगर, इंदिरा माता नगर, राजगुरू नगर तसेच दुर्गा चौक, शुभम नगरात केलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांचीही कबुली दिली.
पोलिसांनी त्याच्याकडून सोनसाखळ्या, अंगठ्या, मंगळसूत्र आदी दागिन्यांसह ११ तोळे सोन्याचे आणि १० तोळे चांदीचे दागिने जप्त केले. अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. दिलीप झळके, उपायुक्त नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज हांडे, द्वितीय निरीक्षक दिनेश लबडे यांच्या नेतृत्वात साहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश हत्तीगोटे, राजाराम ढोरे, आशिष दुबे, योगेश बहादुरे आणि योगिता राखडे यांनी ही कामगिरी बजावली.
---
यापूर्वीही अनेकदा कारवाई
कुख्यात भोकण्याला यापूर्वीही पोलिसांनी अनेकदा अटक केली असून, त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात चोरीचा ऐवजही जप्त करण्यात आला आहे. त्याला अनेकदा कोठडीतही डांबण्यात आले आहे. मात्र, त्याची गुन्हेगारी वृत्ती जैसे थेच आहे.