नरेश डोंगरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या संबंधाने ‘एक अनार और साै...’ अशी काहीशी अवस्था असल्याने मनासारखी पोस्टिंग मिळावी यासाठी राज्य पोलीस दलातील अनेक अधिकाऱ्यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे. गेल्या वर्षी पोलीस बदली प्रक्रियेच्या अनुषंगाने ‘रेकॉर्डिंग’ झाल्यामुळे यावर्षी धाकधूक असली तरी धावपळ कायम आहे.
राज्य पोलीस दलाच्या बदल्यात मोठा आर्थिक व्यवहार होत असल्याचा पोलीस दलातील शीर्षस्थांकडून आरोप झाल्याने तीन महिन्यांपूर्वी प्रचंड खळबळ उडाली होती. राज्य सरकार चांगलेच अडचणीत आले होते. या पार्श्वभूमीवर, गृहमंत्री अनिल देशमुख यांना पदही सोडावे लागले. मात्र, आरोपांची राळ उडणे अद्याप थांबलेले नाही. या पार्श्वभूमीवर, राज्य पोलीस दलातील अधीक्षक आणि त्यापेक्षा वरच्या दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदलीपूर्व प्रक्रियेला आता वेग आला आहे. राज्य सरकारने कोरोनाचा प्रकोप लक्षात घेत ३० जूनपर्यंत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार नाहीत, असे जाहीर केले आहे. अर्थात सरकारी घोषणेनुसार किमान तीन आठवडे अजून कुणाच्या बदल्या होणार नसल्याचे सांगितले जात असले तरी सरकारच्या मनात काहीही येऊ शकते अन् कोणताही निर्णय बदलला जाऊ शकतो, असेही मत अनेक वरिष्ठ अधिकारी व्यक्त करीत आहेत. या पार्श्वभूमीवर, ठिकठिकाणी आपला दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे अनेक अधीक्षक, उपायुक्त दर्जाचे पोलीस अधिकारी मनासारखी पोस्टिंग मिळवून घेण्यासाठी ‘आवश्यक ते सर्व प्रयत्न’ करीत आहेत.
विदर्भातील सात अधिकारी बदलणार
यावेळी क्रीम पोस्टिंग फारच कमी आहे. विदर्भाचा विचार केला तर येथे नागपूर आणि अमरावती ग्रामीण या दोनच ठिकाणचे पोलीस अधीक्षक अनुक्रमे राकेश ओला आणि श्रीहरी बालाजी यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांची बदली होणार आहे. अन्य ९ जिल्ह्यांपैकी वाशिम येथील अधीक्षकांची बदली झालीच तर होऊ शकते, अद्याप त्यांचा कार्यकाळ पूर्ण झालेला नाही. नागपूर शहरात १० उपायुक्त आहेत. त्यांच्यापैकी विनिता शाहू, निलोत्पल, गजानन राजमाने, विवेक मासाळ यांचीही बदली होणार असल्याची खास सूत्रांची माहिती आहे.
चढाओढ नागपूर, अमरावतीसाठी
नागपूर आणि अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षकांचे पद म्हणजे क्रीम पोस्टिंग मानली जाते. त्यात नागपूर एसीबी एसपींचे पदही असेच सन्मानजनक आहे. त्यामुळे या ठिकाणी वर्णी लागावी म्हणून अनेक जण जोरदार प्रयत्न करीत आहेत.
---
प्रक्रियेकडे अनेकांचे लक्ष
बदलीच्या संबंधाने होणाऱ्या घडामोडींकडे यावेळी अनेकांनी नजर केंद्रित केली आहे. राज्यातील किती पोलीस अधिकाऱ्यांची बदली होईल, तो आकडा निश्चित नाही. मात्र, बदलीसाठी पात्र असलेल्या अधिकाऱ्यांची यादी तयार असल्याचे वरिष्ठ सूत्रांचे सांगणे आहे. त्यात शेवटपर्यंत थोडाफार बदल अपेक्षित आहे. ‘फोन कॉल्स रेकॉर्डिंग’चे प्रकरण प्रचंड गाजल्यामुळे ‘धावपळ’ सुरू असल्याचे सर्वच सांगतात. मात्र, यासंबंधाने कुणी काही मोकळेपणाने फोनवर बोलण्यास तयार नाहीत.
---