नागपूर : चार दिवसांपूर्वीच मान्सूनने हजेरी लावली. मात्र, काहीच भागात पावसाची नोंद झाली; परंतु सोमवारी सायंकाळी मान्सूनचा पहिला पाऊस संपूर्ण जिल्ह्यात धो धो बरसला. सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट सुरू झाला. साडेसात वाजेच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. सुरुवातीला तुरळक पाऊस पडल्यानंतर पावसाने चांगलाच जोर धरला. तासभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील खोलगट भागातील रस्त्यावर पाणी साचले होते. क्रीडा चौक व गांधीबाग औषध मार्केट परिसरात झाड पडल्याची माहिती आहे. सायंकाळी पडलेल्या पावसामुळे लोकांची चांगलीच तारांबळ उडाली.
हवामान खात्याने सोमवारी जिल्ह्यातील विविध भागात पावसाचा इशारा दिला होता. गेल्या चार दिवसांपासून पावसाचा लपंडाव सुरू असल्याने उम्मीद चांगलीच वाढली होती. नागपूरकर चातकासारखी पावसाची प्रतीक्षा करीत होते. अखेर सोमवारी सायंकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. तासभर पडलेल्या पावसाने वातावरण गार करून टाकले. सायंकाळी फिरायला निघालेल्या अनेकांनी पावसापासून बचावाचे साहित्य सोबत न बाळगल्याने त्यांना पावसा चिंब भिजावे लागले. ९ वाजेच्या सुमारास पाऊस थांबला असला तरी आकाशात ढगांचा गडगडाट रात्री उशिरापर्यंत सुरूच होता. हवामान खात्याने रात्री ८.३० वाजेपर्यंत ११.६ मिमी पावसाची नोंद केली आहे.