नागपूर : याकूब मेमनला फाशी देण्याच्या पार्श्वभूमीवर शहरात चोख बंदोबस्त लावण्यात येईल, अतिविशेष स्थळ, सरकारी कार्यालय यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात येईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र नागपूर पोलिसांनी अशी कुठलीही उपाययोजना केली नव्हती. अतिविशेष स्थळांची, इमारतींची सुरक्षा व्यवस्था नेहमीप्रमाणेच होती. याकूबच्या फाशीच्या निर्णयावर देशाच्या राजधानीत सुनावणी सुरू असताना, पोलिसांनी शहरातील रस्त्यारस्त्यावर नाकाबंदी केली होती. रात्रीला पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करीत होते. बुधवारी मध्यरात्री तर पोलिसांचे पथक रस्त्यारस्त्यावर तैनात होते. शहराच्या सीमावर नाकाबंदी करण्यात आली होती. सर्वत्र चोख बंदोबस्त असतानाही, शहरातील अतिविशेष स्थळ, सरकारी कार्यालयांना विशेष सुरक्षा पुरविण्यात आली नव्हती. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या रामगिरी बंगल्याची सुरक्षा नेहमीप्रमाणेच होती. एक पीएसआय आणि पाच ते सहा पोलीस कर्मचारी एवढाच ताफा तेथे तैनात होता. शहरात एवढी मोठी घटना घडत असताना, सुरक्षेचा कुठलाही तणाव रामगिरीच्या सुरक्षेत असलेल्या पोलिसांना जाणविला नसल्याचे तेथे तैनात अधिकाऱ्याने सांगितले. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थानाबरोबरच विधिमंडळाच्या इमारतीच्या सुरक्षेत देखील अतिरिक्त सुरक्षा वाढविली नव्हती. नेहमीच्याच तैनात असलेल्या पोलिसांनी येथील सुरक्षेची जबाबदारी चोख बजावली. हैद्राबाद हाऊस, विभागीय आयुक्त कार्यालय, रविभवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हापरिषद, प्रशासकीय इमारत येथे तर पोलीसही दिसून आले नाही. उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ, जिल्हा सत्र न्यायालय, पोलीस आयुक्त कार्यालय येथे नेहमीचाच पोलीस बंदोबस्त दिसून आला. शहरातील या महत्त्वाच्या स्थळांना, कार्यालयांना पोलिसांनी सुरक्षा देण्याची गरज भासली नाही. कदाचित पोलिसांना या स्थळांना अतिसुरक्षा देऊन, लोकांमध्ये दहशत निर्माण करायची नव्हती, यामागचा हा उद्देश असू शकतो. मेडिकल चौक शहरातील मेडिकल चौकात मध्यरात्रीपासून पोलिसांनी नाकाबंदी केली होती. इमामवाडा पोलिसाचे पथक रस्त्यावर बॅरिकेट लावून, संशयितांची तपासणी करीत होते. एकीकडे रस्त्यावर पोलीस तैनात असताना, बाजूच्याच चहा टपरीवर वृत्तपत्र चाळत-चाळत याकूबच्या फाशीच्या चर्चा रंगल्या होत्या. याच रस्त्यावरील एका पानठेल्यावर टीव्ही सुरू होती. येथे चॅनल्सवर याकूबचा लाईव्ह घटनाक्रम सामान्य नागरिकांसह पोलीसही बघत होते. सिव्हिल लाईन्सशहरातील सिव्हिल लाईन हा परिसर नेहमीप्रमाणेच शांत होता. रस्त्यावर मॉर्निंग वॉक करणारे सकाळी घराबाहेर पडले होते. मॉर्निंग वॉक करून दमलेले टपरीवर चहाचा घुट घेत, वृत्तपत्र चाळण्यात गुंग होते. परिसरात सरकारी कार्यालय असल्याने, कार्यालयात येणाऱ्या-जाणाऱ्यांची रस्त्यावर वर्दळ सुरू झाली होती. परिसरात पोलिसांचा बंदोबस्त दिसून आला नाही. परिसरातील लोकांमध्ये घटनेची कुठलीही भीती दिसली नाही. सेंट्रल अॅव्हेन्यू सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. सेंट्रल अॅव्हेन्यू मार्गावर प्रत्येक चौकात बंदूकधारी पोलीस तैनात करण्यात आले होते. इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस रस्त्यावर ड्युटी करताना दिसले तरीसुद्धा सर्वसामान्य नागरिक नेहमीप्रमाणे आपापल्या कामात व्यस्त होते. नागरिकांमध्ये कुठलाही तणाव जाणवला नाही. दरम्यान पोलिसांचे गस्तीचे वाहनही परिसरात फिरताना दिसत होते.हसनबाग याकूबला फाशी दिल्यानंतर शहरातील नंदनवन, हसनबाग परिसराची पाहणी केली असता ठिकठिकाणी पानठेले, चहाटपरी, हॉटेलमध्ये नागरिक फाशीच्या शिक्षेवर चर्चा करताना दिसत होते. परिसरात प्रत्येक चौकात पोलीस तैनात करण्यात येत होते. याकूबचा वृत्तपत्रात छापण्यात येत असलेला फोटो खुप जुना आहे. आता त्याची दाढी खूप वाढलेली आहे, असा अंदाज नागरिक लावत होते. याशिवाय याकूबचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे की नाही, त्याच्यावर अंत्यसंस्कार कुठे होतील, अशा शंका नागरिक उपस्थित करताना दिसले.संघ मुख्यालयात दक्षता याकूबला फाशी देण्यात येणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर संघ मुख्यालयाची सुरक्षा वाढविण्यात आली. एरवी संघ मुख्यालयाला सातत्याने सुरक्षा दिली जाते पण याकूबच्या फाशीच्या निमित्ताने सुरक्षा व्यवस्था अधिक चोख ठेवण्यात आली. पोलीस आणि सुरक्षा व्यवस्थेत तैनात असलेले कमांडो संघ मुख्यालय परिसरात प्रत्येक वाहनांचे आणि व्यक्तींचे बारीक निरीक्षण करीत होते. संघ मुख्यालयात जाणाऱ्या स्वयंसेवकांची तपासणी करून त्यांना आत सोडण्यात येत होते. याकूबच्या फाशीने परिसरात सुरक्षा व्यवस्थेचा अपवाद वगळता वातावरण सामान्य होते. संघ मुख्यालयाच्या आवारात सुरक्षा व्यवस्था असण्याची नागरिकांना सवय झाली आहे. पण परिसरात आजूबाजूलाही सशस्त्र कमांडो तैनात असल्याने नागरिकांमध्ये चर्चा होती. रात्रीपासूनच हे कमांडो तैनात असल्याने याकूबच्या फाशीबाबत रात्रीही चर्चा सुरू होत्या. महाल, मोमिनपुरा, हसनबाग, ताजबागसह शहरात सर्वत्रच याकूबच्या फाशीबाबत काय निर्णय होणार म्हणून नागरिकांमध्ये कुतुहलाचे वातावरण होते. रात्री सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत अनेक लोक दूरचित्रवाहिनीवर होते. फाशीचा निर्णय कायम ठेवण्यात आल्याने फाशी होणार हे निश्चित झाले. परंतु दैनंदिन कामकाजावर त्याचा फारसा परिणाम झाला नाही. सकाळी संघ मुख्यालय परिसरातील शाखा नियमित लागली होती.
अतिविशेष स्थळांवर तगडी सुरक्षा
By admin | Published: July 31, 2015 2:47 AM