काटोल : राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने दहावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. त्यात काटोल येथील बनारसीदास रुईया हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी दमदार यश मिळविले आहे. अशा गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार शनिवारी शाळा व्यवस्थापनाच्यावतीने करण्यात आला. बनारसीदास रुईया कॉन्व्हेन्ट काटोल येथील कशिश नरेंद्र सरोदे (९९ टक्के), अनुष्का सुरेश भुजाडे (९८.४० टक्के), हर्षदा अजय राऊत (९७.६० टक्के) तर बनरासीदास रुईया हायस्कूल व ज्युनियर कॉलेजची हिमांशी नरेंद्र घोडे (९७.६० टक्के), दर्शना किशोर रेवतकर (९७.२९ टक्के), त्रिशा विजय डोंगरे (९६.४० टक्के) यांचा समावेश आहे. सत्कार सोहळ्याच्यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. गोविंद भुतडा, सचिव जवाहर चांडक, शाळेच्या प्राचार्या संध्या टावरी, माजी प्राचार्या अरुणा पवार, समन्वयक अंजली घोडे, शिक्षक व विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.
वृत्तपत्र विक्रेत्याच्या मुलीची भरारी
रुईया कॉन्व्हेंटमध्ये शिकणाऱ्या अनुष्का सुरेश भुजाडे हिने ९८.४० टक्के गुण मिळविले आहेत. तिचे वडील सुरेश हे घरोघरी वृत्तपत्र पोहोचविण्याचे कार्य करतात. २८ वर्षांपासून ते ही सेवा काटोल परिसरातील नागरिकांना देत आहेत. त्यातूनच ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्याजवळ उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नाही. लॉकडाऊन काळात त्यांच्या या कार्याला काहीशी खीळ बसली होती. मात्र, त्यांनी न थांबता हे कार्य सुरू ठेवले. अशा विपरीत परिस्थितीत त्यांच्या मुलीने केलेली कामगिरी काटोलकरांसाठी अभिमानास्पद बाब आहे. अनुष्का हिला वैद्यकीय सेवेत करिअर करायचे आहे. या माध्यमातून तिला गरिबांची सेवा करायची आहे.