लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इतिहासकार तारखा आणि पुरावे, यांच्या भांडणात मश्गुल आहेत आणि त्यात राजकीय मंडळी आपले राजकारण तापवत असते. इतिहासकारांनी आपले शोध जरूर करावे आणि कुठे तरी एकत्र येऊन पुढच्या पिढीपुढे खरा इतिहास पुढे आणावा, असे आवाहन शिवचरित्राचे प्रख्यात व्याख्याते डॉ. सुमंत टेकाडे यांनी आज येथे केले.छत्रपती सेवा प्रतिष्ठानच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती, तुकाराम बीज आणि छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथीच्या निमित्ताने सायंटिफिक सभागृहात ‘शब्दांच्या पलिकडले शिवराय’ या विषयावरील टेकाडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन बुधवारी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे होते तर व्यासपीठावर प्रतिष्ठानचे सचिव संजय देशकर उपस्थित होते. याप्रसंगी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले शिवप्रेमी दत्ता शिर्के व अतुल गुरू यांचा विशेष सत्कार करण्यात आला.शिवरायांच्या जयंती, पुण्यतिथी आणि राज्याभिषेकाच्या तिथी आणि तारखेवर वाद निर्माण करणाऱ्यांचा समाचार घेत टेकाडे यांनी, शिवविचार जनतेपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न करण्याचे आवाहन केले. छत्रपतींच्या मोहिमा त्यावेळी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या कालगणनेनुसार राबविल्या. तेव्हा आज तारखेचा अट्टहास का केला जातोय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. वर्तमानात छत्रपतींचा इतिहास ‘मला वाटले म्हणून लिहिले’ अशा तत्त्वावर आणला जात आहे. त्यामुळे, इतिहासकारांनी आपल्या संशोधनाविषयी अहंकार न बाळगता समन्वय साधून छत्रपतींचाच नव्हे तर संपूर्ण देशाचा इतिहासा पुढे आणावा, असे ते म्हणाले. छत्रपती शिवराय म्हणजे राम आणि कृष्णाचे एकत्र रूप होते. मात्र, आपण रामही विसरलो आणि कृष्णही आणि छत्रपतींच्या चरित्रात आलेल्या व्यवस्थापन, कार्य, पराक्रम अशा सगळ्यांना तिलांजली देऊन त्यांना देव करून टाकल्याची वेदनाही सुमंत टेकाडे यांनी यावेळी व्यक्त केली.संचालन प्रसन्न बारलिंगे यांनी केले. प्रास्ताविक संजय देशकर यांनी केले. शिवस्तुती देविका मार्डीकर हिने सादर केली. तुकारांमांचा अभंग अजय देवगांवकर यांनी सादर केला. आभार संजय बारहाते यांनी मानले.
इतिहासकारांच्या भांडणात राजकारण्यांचे फावते : सुमंत टेकाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2020 10:56 PM
इतिहासकारांनी आपले शोध जरूर करावे आणि कुठे तरी एकत्र येऊन पुढच्या पिढीपुढे खरा इतिहास पुढे आणावा, असे आवाहन शिवचरित्राचे प्रख्यात व्याख्याते डॉ. सुमंत टेकाडे यांनी आज येथे केले.
ठळक मुद्देशिवरायांचे चरित्र शब्दांच्या पलिकडलेदत्ता शिर्के व अतुल गुरू यांचा सत्कार