लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य परिवहन महामंडळाच्या गणेशपेठ बस आगाराचा व्यवस्थापक विजय पंजाबराव कुडे याला तीन हजारांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. कॉटन मार्केट चौकातील एका बारमध्ये शुक्रवारी सायंकाळी ६. १० वाजता झालेल्या या कारवाईमुळे एसटी कर्मचाऱ्यांत प्रचंड खळबळ उडाली.कुडे गेल्या अडीच वर्षांपासून गणेशपेठ आगाराचा व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे. तक्रार करणारे एसटीचे वाहक पिलीया झाल्यामुळे तीन महिने रजेवर होते. त्यांची रजा मंजूरही झाली होती आणि रजेच्या कार्यकाळातील ६१ दिवसांचे वेतन कुडेने मंजूर केले होते. मात्र, त्या बदल्यात तो लाच मागत होता. विनाकारण तो लाचेची मागणी करीत होता आणि ती देण्याची तयारी नसल्याचे त्याच्या लक्षात आल्याने तो अपमानित करीत होता. त्याला लाच दिली नाही तर तो भविष्यात नुकसान करू शकतो, हे ध्यानात आल्याने वाहकाने एसीबीच्या अधीक्षक रश्मी नांदेडकर यांची भेट घेऊन तक्रार नोंदवली. तक्रारीची शहानिशा करवून घेण्यात आली. त्यानंतर अधीक्षक नांदेडकर, अतिरिक्त अधीक्षक राजेंद्र दुद्धलवार, राजेंद्र नगरे यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापक कुडेला पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला.एसीबीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनेनुसार, लाचेची रक्कम घेऊन वाहकाने कुडेसोबत संपर्क केला. त्याने रक्कम घेऊन डेपोत यायला सांगितले. नंतर सायंकाळी ६ वाजता कॉटन मार्केट चौकातील डिप्लोमॅट बीअर बारमध्ये बोलविले. त्यानुसार, १० मिनिटातच तक्रार करणारे वाहक बारमध्ये पोहचले. तत्पूर्वीच साध्या वेशातील एसीबीचे कर्मचारी बारमध्ये पोहचले. बारमध्ये कार्यालयातील एका सहकाऱ्यासह दारूचे पेग रिचवित असलेल्या कुडेने तक्रार करणाऱ्या वाहकाकडून लाचेचे तीन हजार रुपये स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याच्या मुसक्या बांधल्या. लाचखोर अधिकाऱ्याला एसीबीने पकडल्याचे लक्षात येताच बीअर बारमधील मद्यपीतही गोंधळ उडाला. कुडेला बाहेर आणून गणेशपेठ ठाण्यात नेण्यात आले. त्याच्याविरुद्ध तेथे गुन्हा दाखल करण्यात आला.आगारातील वातावरण गरमव्यवस्थापक कुडेच्या एसीबीने मुसक्या बांधल्याचे वृत्त कळताच गणेशपेठ आगारात एकच खळबळ निर्माण झाली. मोठ्या संख्येत कर्मचारी आगारातील कुडेच्या कक्षासमोर जमले. त्यातील बहुतांश ‘कुडे पीडित’ होते. एक -दोन कुडेच्या दलालाची भूमिका वठवित असल्याने त्यांनी तेथे कुडेच्या समर्थनाची भाषा वापरताच इतरांनी त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली. कुडेच्या लाचखोरीचे अनेक किस्सेही यावेळी चर्चेला आले. त्यामुळे वातावरण गरम झाले.कार्यालय आणि निवासस्थानाची झडतीकुडेला पकडल्यानंतर एसीबीच्या दुसऱ्या पथकाने कुडेच्या कार्यालयीन कक्षाची तसेच त्याच्या निवासस्थानाची झडती घेतली. तेथे एसीबीला हाती काय लागले, ते रात्री उशिरापर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही. कुडेच्या मुसक्या बांधण्याची कामगिरी एसीबीच्या अधीक्षक रश्मी नांदेडकर, अतिरिक्त अधीक्षक राजेश दुद्धलवार, राजेंद्र नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश पुरी, हवलदार प्रवीण पडोळे लक्ष्मण परतेती, प्रभाकर बेले आणि परसराम शाही यांनी बजावली.
एसटीचा लाचखोर व्यवस्थापक जेरबंद : बीअर बारमध्ये कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 11:35 PM
राज्य परिवहन महामंडळाच्या गणेशपेठ बस आगाराचा व्यवस्थापक विजय पंजाबराव कुडे याला तीन हजारांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. कॉटन मार्केट चौकातील एका बारमध्ये शुक्रवारी सायंकाळी ६. १० वाजता झालेल्या या कारवाईमुळे एसटी कर्मचाऱ्यांत प्रचंड खळबळ उडाली.
ठळक मुद्देमहामंडळात खळबळ