नागपूर : एसटी महामंडळात नियुक्ती झाल्यानंतर सेवा खंडित केलेल्या रोजंदारी चालक कम वाहकांनी आता कायदेशीर लढा देण्याचा निर्धार केला आहे. नागपूर व यवतमाळच्या कर्मचाऱ्यांनी एकत्र येत प्रशासनाला नोटीसही बजावली आहे.
कर्मचाऱ्यांचा तुटवडा भासत असल्याने एसटी महामंडळाकडून भरतीप्रक्रिया राबविली गेली होती. नियुक्तीनंतर प्रशिक्षण झालेल्या ८३ रोजंदारी गट क्रमांक १ चालक कम वाहकांची नियुक्ती नागपूर विभागात करण्यात आली होती. टप्प्याटप्प्याने विभागाला २३० कर्मचारी मिळणार आहेत. नियुक्त कर्मचाऱ्यांना प्रारंभीच्या काळात लॉकडाऊनमध्ये हजेरी वेतनही मिळाले. जून २०२० मध्ये मुख्यालयाच्या निर्देशानुसार या कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली. तेव्हापासून कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतरही या कर्मचाऱ्यांना ड्यूटीपासून वंचित ठेवण्यात आले. एकीकडे वेतन नाही, दुसरीकडे खासगी कामही करता येत नसल्याने या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ ओढवली आहे. आता कोरोनाचे संकट बऱ्याच अंशी दूर झाले आहे. एसटीच्या फेऱ्याही नियमित स्वरूपात सुरू आहेत. कर्मचाऱ्यांच्या तुटवड्यामुळे फेऱ्या रद्द करण्याची वेळही येते आहे. यानंतरही नियुक्ती मिळत नसलेल्या रोजंदारी कर्मचाऱ्यांनी लढा देण्याचा निर्धार केला आहे. यवतमाळच्या कर्मचारीही यात सहभागी झाले आहेत. अॅड. संजय नेरकर यांच्यामार्फत नागपूर व यवतमाळच्या कर्मचाऱ्यांनी मिळून प्रशासनाला नोटीस बजावली आहे. नियुक्तीसंदर्भात ३० दिवसांमध्ये निर्णय घ्यावा किंवा नियुक्ती का करता येत नाही याबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आले आहे. या कालावधीत प्रश्न मार्गी न लागल्यास न्यायालयात जाण्याची तयारी कर्मचाऱ्यांनी केली आहे. रोजंदारी कर्मचारी म्हणून नियुक्ती मिळालेल्या राज्यभरातील कर्मचाऱ्यांची सारखीच अवस्था आहे. पूर्वी नियुक्ती मिळालेले कर्मचारीच सेवेतून बाहेर आहेत. त्यात प्रशिक्षण सुरू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा प्रश्नही उभा राहणार असल्याने आगामी दिवसांमध्ये नागपूरमधून सुरू झालेला संघर्ष राज्यभरात पोहोचण्याची शक्यता आहे.
............