लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) वतीने रविवारी यांत्रिकी सहायक पदासाठी घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्यात आली आहे. नागपुरातील झुलेलाल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी या परीक्षा केंद्रावर पेपर फुटल्याचा आरोप करित परिक्षार्थ्यांनी गोंधळ घातला होता. त्याचे पडसाद राज्यभर उमटले. दुपारी १२ वाजता मोबाईवर (सोशल मिडियावरून) हा पेपर व्हायरलही झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार झुलेलाल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी येथील परीक्षा केंद्रावर काही विद्यार्थ्यांना सकाळी ११.३० वाजता वेळेवर पेपर देण्यात आला होता. परंतु दोन खोल्यातील पर्यवेक्षक १२ वाजेपर्यंत परीक्षा खोलीत न पोहोचल्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेवर पेपर मिळल नसल्याची ओरड करीत गोंधळ घातला. याशिवाय काही परीक्षार्थी बंद खोलीत पेपर सोडवित असल्याचे निदर्शनास आल्यामुळे परीक्षार्थ्यांनी गोंधळ घालून या केंद्रामधील साहित्याची तोडफोड केली. पोलिसांना वेळीच पाचारण केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणाखाली आली.एसटी महामंडळाच्यावतीने यांत्रिकी सहायक पदासाठी रविवारी राज्यभर परीक्षा घेतली. पेपरची वेळ सकाळी ११.३० असल्याचे आधीच कळविण्यात आले होते. या परीक्षेसाठी १२०० परीक्षार्थींना झुलेलाल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी हे परीक्षा केंद्र देण्यात आले होते. मात्र, या परीक्षा केंद्रावर परीक्षार्थींच्या ओळखपत्र किंवा प्रवेशपत्राची कुठलीही तपासणी झाली नाही. बाकांवर परीक्षा क्रमांक नसल्याने परीक्षार्थी मिळेल त्या बाकावर व खोलीत परीक्षा देण्यासाठी बसत होते. काही ठिकाणी एका बाकावर तीन परीक्षार्थी बसल्याचे दिसून आले. त्यातच नरेंद्र सोनवाने व दिनेश कावळे हे परीक्षार्थी त्यांचा परीक्षा क्रमांक शोधत होते. त्यावर परीक्षा नियंत्रकांनी या दोघांनाही मिळेल त्या ठिकाणी बसून पेपर सोडविण्याची सूचना केली. ते खोली शोधत असताना एका कुलूपबंद खोलीत हालचाली सुरू असल्याचा दोघांनाही संशय आला. त्यामुळे त्यांनी व्यवस्थापकाकडे ती खोली उघडण्याची मागणी केली. खोली उघडताच आत काही परीक्षार्थी पेपर सोडवित असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हाच प्रकार अन्य एका खोलीतही सुरू होता. ही बाब इतरांना कळताच अन्य खोल्यांमधील परीक्षार्थी लगेच गोळा झाले आणि त्यांनी या प्रकाराबाबत परीक्षा नियंत्रकांना विचारणा केली. त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने परीक्षार्थी आक्रमक झाले आणि त्यांनी तोडफोड करण्यास सुरुवात केली. त्यांनी एका खोलीतील प्रोजेक्टर व दाराच्या काचांची तोडफोड केली. माहिती मिळताच एसटीचे विभाग नियंत्रक सुधीर पंचभाई, सहायक पोलीस आयुक्त रमेश तायवाडे, कोराडीचे ठाणेदार सतीश गोराडे सहकाऱ्यांसह परीक्षा केंद्रावर दाखल झाले. या अधिकाऱ्यांनी परीक्षार्थींना शांत करण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात सहायक पोलीस आयुक्त रमेश तायवाडे यांच्याशी लोकमतने संपर्क साधला असता अद्याप याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे सांगितले. परीक्षेतील गोंधळामुळे परीक्षार्थींनी ही परीक्षा रद्द करण्याची मागणी केली. त्यावर एसटीचे विभाग नियंत्रक सुधीर पंचभाई यांनी या संदर्भात त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर ही परीक्षा रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले. या केंद्रावरील परीक्षार्थींना नवीन परीक्षेची सूचना दोन दिवसात देण्याचे पंचभाई यांनी सांगितल्यानंतर या केंद्रावरील परीक्षार्थी शांत झाले.पेपर फुटला ही अफवा‘आरसीस इन्फोटेक मुंबई या कंपनीला महामंडळाच्या यांत्रिकी सहायक या पदाची परीक्षा घेण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. झुलेलाल इन्स्टिट्यूटमधील २१ खोल्यांमध्ये १२०० विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येणार होती. परंतु यातील दोन खोल्यातील पर्यवेक्षक उशिरा पोहोचल्यामुळे त्या खोल्यातील परीक्षार्थ्यांना उशिरा पेपर मिळाले आणि त्यांनी गोंधळ घातला. यात पेपर फुटला ही अफवा असून त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये.’-सुधीर पंचभाई, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ,
एसटीची परीक्षा पंक्चर
By admin | Published: July 10, 2017 1:22 AM