लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंजिनियरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका विद्यार्थिनीची फसवणूक करण्यात आली. अभिजित सोळंकी (३०) रा. म्हाळगीनगर आणि शिंदे (४५) रा. हिंगणा असे आरोपीची नावे आहे.तक्रारकर्ता २१ वर्षीय विद्यार्थिनी लकडगंज पोलीस ठाणे परिसरात राहते. तिने नंदनवन येथील एका कॉलेजमधून पॉलिटेक्निक केले आहे. यानंतर तिला इंजिनियरिंगमध्ये प्रवेश घ्यायचा होता. जून २०१६ मध्ये विद्यार्थिनीची शिकवणी वर्गाच्या शिक्षकाच्या माध्यमातून आरोपीसोबत ओळख झाली. आरोपींनी विद्यार्थिनीला रामदेवबाबा इंजिनियरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवले. प्रवेशासाठी ९० हजार रुपये व मूळ प्रमाणपत्र घेतले.परंतु नुकतीच तिने तपासणी केली असता कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नसल्याचे लक्षात आले.तेव्हा विद्यार्थिनीने आरोपीला दिलेले पैसे आणि आपले मूळ शैक्षणिक दस्तावेज परत मागितले. परंतु आरोपींनी दोन्ही परत करण्यास नकार दिला. तेव्हा विद्यार्थिनीने लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या आधारावर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. विद्यार्थिनीचे म्हणणे आहे की, ती दोन वर्षांपासून कॉलेजमध्ये जात होती. तिला परीक्षेसाठी वेगळ्या खोलीत बसवण्यात येत होते. तिथे तिच्यासोबत आणखी १५ ते २० विद्यार्थी राहायचे. पोलिसांनी ओळखपत्राबाबत विचारणा केली असता विद्यार्थिनीने ते मिळाले नसल्याचे सांगितले आहे. ओळखपत्राशिवाय परीक्षा देणे शक्य नाही. त्यामुळे विद्यार्थिनीच्या माहितीमुळे पोलीसही आश्चर्यचकित झाले. रामदेवबाबा इंजिनियरिंग कॉलेज ही एक प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था आहे. या प्रकरणाशी संस्थेचा काहीही संबंध नाही. तरीही विद्यार्थिनीने दिलेल्या माहितीच्या आधारावर पोलीस सखोल चौकशी करीत आहे. विद्यार्थिनीची आई शिक्षिका आहे.