८,८०७ शाळांचा सहभाग : ‘इको क्लब’ चे बळकटीकरण होणारनागपूर : केंद्र शासनाच्या मदतीने राज्यातील शाळांमध्ये राष्ट्रीय हरित सेना योजनेंतर्गत तयार करण्यात आलेल्या ‘इको क्लब’चे बळकटीकरण करण्यासाठी राज्य शासनाने आता ‘विद्यार्थी हरित सेना’ ही नवी योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, सध्या पर्यावरणाचे रक्षण आणि सुरक्षितता मानवापुढील मोठे आव्हान ठरले आहे. मात्र लहान मुले ही अतिशय संस्कारक्षम असतात. त्यामुळे त्यांच्यात पर्यावरण संरक्षणाबाबत गोडी आणि जागरूकता निर्माण केल्यास त्याचा भविष्यात चांगला परिणाम अनुभवास येऊ शकतो. या हेतूने राज्यात मागील २००७ पासून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून केंद्र शासनाच्या अनुदानातून राज्यातील २५० शाळांमध्ये ‘राष्ट्रीय हरित सेना’ही योजना राबविली जात आहे. यामध्ये केंद्रातर्फे प्रत्येक शाळेला २५०० रुपयांचे अनुदान दिल्या जात होते. परंतु एवढ्या कमी अनुदानात शाळांना ठोस कार्यक्रम राबविणे शक्य होत नव्हते. त्यामुळे राज्य शासनाने ही गोष्ट लक्षात घेऊन राज्यातील ८,८०७ शाळांमधील ‘इको क्लब’ बळकट करण्यासाठी ‘विद्यार्थी हरित सेना’ ही योजना हाती घेतली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील ८,८०७ शाळांना प्रत्येकी २५०० रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. या अनुदानातून संबंधित शाळांना विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणाच्या सद्यस्थितीबाबत विविध उपक्रमांची अद्ययावत माहिती देणे, पर्यावरण संवर्धनाच्या प्रत्यक्ष कामामध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणे, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनसामान्यांमध्ये जनजागृती करणे, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून बीज संकलन व पेरणी, रोपवाटिका निर्मिती, वृक्ष लागवड करणे, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून प्रदूषण नियंत्रण करणे, विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ऊर्जा बचतीबाबत जनजागृती करणे व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विविध पर्यावरणविषयक दिन व सणांचे औचित्य साधून पर्यावरणविषयक जनजागृती करणे, असे विविध उपक्रम राबविणे अपेक्षित आहे. (प्रतिनिधी)
राज्यात राबविणार ‘विद्यार्थी हरित सेना’ योजना
By admin | Published: March 07, 2017 2:21 AM