नागपूर विद्यापीठ : दीक्षांत समारंभाचा बहिष्कार करणारनागपूर : ‘पीएचडी’ संशोधनासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात मार्गदर्शकांची संख्या अपुरी असल्यामुळे उमेदवार हैराण झाले आहेत. विद्यापीठाच्या धोरणांमुळे नाराज असलेल्या या ‘पेट’ (पीएचडी एन्ट्रन्स एक्झाम)उत्तीर्ण उमेदवार व विद्यार्थ्यांनी १०३ व्या दीक्षांत समारंभाचा बहिष्कार करण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत हे विद्यार्थी मागील दीक्षांत समारंभात मिळालेली पदके व पुरस्कार परत करणार आहेत. शिवाय यंदादेखील कुठलेही पदक स्वीकारणार नाहीत.‘पेट’ उत्तीर्ण झाल्यानंतरदेखील उमेदवारांसमोरील संभ्रम संपलेला नाही. विद्यापीठाच्या नवीन नियमांनुसार मार्गदर्शकांचा दुष्काळ निर्माण झाल्यामुळे संशोधन कसे करावे असा प्रश्न उमेदवारांना पडला आहे. ‘आरआरसी’समोर उमेदवारांचे ‘सिनॉप्सिस’ ठेवण्यात येतील. ‘सिनॉप्सिस’साठी उमेदवारांना मार्गदर्शकांचे नाव सादर करणेदेखील आवश्यक असते. मात्र अनेक विभाग व संशोधन केंद्रांमध्ये मार्गदर्शकांची संख्या मर्यादित आहे. नव्या नियमांनुसार प्रोफेसर आठ, सहयोगी प्रोफेसर सहा तर सहायक प्रोफेसर चार उमेदवारांना मार्गदर्शन करू शकतात. अनेक मार्गदर्शकांकडे अगोदरच क्षमतेहून जास्त उमेदवार आहेत. त्यामुळे ते नव्या उमेदवारांना मार्गदर्शन करूच शकणार नाहीत. सेवानिवृत्त प्राध्यापकदेखील मार्गदर्शक म्हणून राहू शकणार नाहीत. यासंदर्भात काही उमेदवार विद्यापीठाच्या परीक्षा विभागात जाऊन अधिकाऱ्यांशी भेटले. मार्गदर्शक पुरविण्याची जबाबदारी विद्यापीठाची नसल्याचे त्यांना उत्तर मिळाले. मार्गदर्शकांसाठी त्यांना कमीत कमी तीन वर्षांची प्रतीक्षा करावी लागेल. याअवधीत त्यांना मार्गदर्शक नाही मिळाला तर परत ‘पेट’ द्यावी लागेल. तेथे समाधान न झाल्यामुळे त्यांनी प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांची भेट घेतली व समस्यांचे निवेदन सादर केले. परीक्षा विभागातील अधिकाऱ्यांच्या उत्तराने संतप्त झालेल्या या उमेदवारांनी दीक्षांत समारंभावरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.(प्रतिनिधी)मग पदके तरी का देता ?महेश लाडे यांनी लोकप्रशासन या विषयात ‘पेट’च्या दोन्ही आव्हानांवर मात करत यश मिळविले आहे. मात्र ते आता मार्गदर्शकांसाठी पायपीट करत आहेत. विद्यापीठातूनदेखील त्यांना समाधानकारक उत्तर देण्यात आलेले नाही. त्यांना ‘एमए’(लोकप्रशासन) अभ्यासक्रमात सर्वाधिक गुण मिळविल्याबद्दल दोन सुवर्णपदके व एक पुरस्कार मिळणार आहे. मात्र ही पदक स्वीकारणार नसल्याची भूमिका महेशने घेतली आहे. याबाबतीत कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांना पत्र लिहिणार असल्याचे त्यांनी सांगितले. या पदकाचा अर्थच काय आहे, असा प्रश्न त्यांना करणार असून दीक्षांत समारंभाचा बहिष्कार करू, असे स्पष्ट केले.
विद्यार्थी पदके, पुरस्कार परत करणार
By admin | Published: October 21, 2016 2:43 AM