लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विद्यार्थ्यांना अरबी भाषा शिकविणाऱ्या युवकाने लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची घटना मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
रफिक खान ऊर्फ मौलाना हाफिज साहब (२७) असे आरोपीचे नाव आहे. १७ वर्षांची पीडित विद्यार्थिनी मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. तिचे वडील घरीच राहतात, तर आई आणि दोन भाऊ मजुरी करतात. आरोपी रफिक खानची विद्यार्थिनीच्या कुटुंबासोबत जुनी ओळख आहे. तो विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना राशन देतो. त्यामुळे विद्यार्थिनी आणि तिचे कुटुंबीय त्याला सन्मान देतात. रफिक विद्यार्थ्यांना अरबी भाषा शिकवितो. रफिकने अल्पवयीन असलेल्या विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखविले. तो ६ मार्च २०२१ रोजी तिच्याशी लपून साक्षगंध करीत होता. त्याची माहिती मिळाल्यामुळे बालसुरक्षा अधिकाऱ्यांनी धाड टाकून साक्षगंध थांबविला. त्यानंतर अल्पवयीन विद्यार्थिनीला काटोल मार्गावरील महिला सुधारगृहात ठेवण्यात आले. २० दिवसांनंतर सुधारगृहातून आईवडिलांनी तिला घरी आणले. १३ एप्रिलला रफिकने तिला घरी बोलावले. तिचा टच स्क्रीन मोबाइल देऊन तिच्यावर प्रेम करीत असल्याचे सांगितले. एका वर्षानंतर लग्न करू, असे सांगून जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केले. कौटुंबिक संबंध असल्यामुळे ती रफिकसाठी टिफिन घेऊन जात होती. दरम्यान, रफिकने तिच्याशी जबरदस्ती केली. तो त्याच्या ओळखीच्या महिलेच्या घरी नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध करू लागला. काही दिवसांपासून रफिक तिला त्रास देत होता. कोणाशीही बोलताना पाहून शंका घेऊन मारहाण करीत होता. तिच्या कुटुंबीयांना मारण्याची धमकी देत होता. त्रस्त होऊन अल्पवयीन विद्यार्थिनीने कुटुंबीयांना आपबिती सांगितली. मंगळवारी सामाजिक कार्यकर्ता सुनीता ठाकरे, हाफिज साबरी तसेच सकीना यांच्या मदतीने मानकापूर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी बलात्कार, मारहाण, धमकी देणे आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
अल्पवयीन मुलीला केले गर्भवती
एमआयडीसीत अल्पवयीन विद्यार्थिनीला तिच्याच वयाच्या आरोपीने वासनेची शिकार बनविल्याची घटना घडली आहे. दोघेही शेजारी आहेत. ऑक्टोबर २०२० मध्ये दोघांची ओळख झाली. आरोपी १६ वर्षाच्या विद्यार्थिनीला मैत्रीच्या बहाण्याने घरी बोलवित होता. तिला प्रेम करीत असल्याची बतावणी करून मिहान परिसरात नेऊन शारीरिक संबंध करीत होता. ही बाब कुणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी त्याने अल्पवयीन मुलीला दिली. त्यामुळे अल्पवयीन मुलगी तीन महिन्यांची गर्भवती झाली. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांना शंका आली. डॉक्टरांनी तपासल्यानंतर खरी माहिती उघड झाली. कुटुंबीयांनी एमआयडीसी ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी छेडखानी आणि धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
.......................