भिवापूर : राज्याच्या शिक्षण विभागाने इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचे आदेश देताच शाळांची दारे उघडी झाली. मात्र भिवापूर शहरातील एका शाळेतील एक विद्यार्थी कोविड पॉझिटिव्ह आढळल्याने तहसीलदार अनिरुद्ध कांबळे यांनी संबंधित शाळा सोमवारपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
स्थानिक भिवापूर एज्यु. सोसायटी बॉईज हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील इयत्ता अकरावी एमसीव्हीसी शाखेचा एक विद्यार्थी कोविड पॉझिटिव्ह आढळला आहे. इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्या असून शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची आरोग्य विभागाकडून नियमित कोविड तपासणी करण्यात येत आहे. दरम्यान, गत सोमवारला सदर शाळेच्या विद्यार्थ्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल बुधवारला प्राप्त झाला. यात सदर शाळेचा विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आला. त्याला विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. याच शाळेतील उर्वरित विद्यार्थ्यांचा अहवाल मात्र निगेटिव्ह आला आहे. लागलीच तहसीलदार कांबळे यांनी बैठक बोलावून सदर शाळा सोमवारपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश दिले. शहरातील अन्य शाळा मात्र नियमित सुरू राहणार आहे. शाळा व्यवस्थापनासह विद्यार्थ्यांनी व पालकांनी काळजी घ्यावी. मास्क, सॅनिटायझर, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहनही कांबळे यांनी केले.