नागपूर : आरटीईत प्रवेश हा नशिबाचाच खेळ आहे. ६ हजार जागांसाठी २५ ते ३० हजार बालकांचे पालक अर्ज करतात. त्यामुळे हजारो बालके प्रवेशापासून वंचित राहतात. अशात एका बालकाची एकाच शाळेत तीन वेळा निवड झाली असेल तर विद्यार्थ्याचे नशीब म्हणावे की आरटीई प्रक्रियेचा चमत्कार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
हा प्रकार काटोल तालुक्यातील एका बालकाच्या बाबतीत घडला आहे. तीन वेळा निवड होऊनही पालकाने अर्ज करतानाच केलेल्या बोगसगिरीमुळे त्या बालकाचा प्रवेश रद्द होण्याची वेळ आली आहे. काटोल तालुक्यातील अरविंद इंडो पब्लिक स्कूलशी निगडित असलेला हा प्रकार आहे. या बालकाच्या पालकाने आरटीईत अर्ज भरताना बालकाच्या नावाचे, स्वत:च्या नावाचे व आडनावाचे तीन वेगवेगळे स्पेलिंग लिहिले. परंतु आईच्या नावाचे स्पेलिंग तीनही अर्जात एकच टाकले. शिवाय एकाच शाळेची निवड केली. आरटीईच्या निवड यादीत या बालकाच्या तीनही वेगवेगळ्या नावाची निवड एकाच शाळेत झाली. तालुक्यातील कागदपत्र पडताळणी समितीने कागदपत्राची तपासणी केल्यानंतर शाळेने एका नावाचा प्रवेशही करून घेतला.
ही बाब आरटीई अॅक्शन कमिटीच्या निदर्शनास आली. कमिटीच्या सदस्यांनी अरविंद इंडो पब्लिक स्कूलमध्ये निवड झालेल्या बालकांची यादी बघितली असता, त्यांना हा बोगसपणा निदर्शनास आला. याच शाळेतील पुन्हा एक बालक आहे, ज्याचीसुद्धा याच शाळेत दोन वेळा निवड झाली. त्यालाही शाळेत प्रवेश मिळाला.
- या प्रकरणात पालकाने बोगसगिरी केली. तालुक्याच्या कागदपत्रे तपासणी समितीने दुर्लक्ष केले. शाळेचाही यात सहभाग आहे. अशा बोगसगिरीमुळे अनेक बालके प्रवेशापासून वंचित राहतात. त्यामुळे या प्रकरणात दोषी असलेल्यांवर कारवाई करण्यात यावी.
मो. शाहीद शरीफ, अध्यक्ष, आरटीई अॅक्शन कमिटी