‘बीकॉम’ द्वितीय वर्षाचा चुकीचा निकाल जाहीर : जबाबदारांवर कारवाई नाहीनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि भोंगळ कारभार हे एक समीकरणच झाले आहे. परंतु विद्यापीठाच्या हलगर्जीपणामुळे चक्क दोन विद्यार्थ्यांचा जीव जाण्याची वेळ आली होती. विद्यापीठाने चुकीचा निकाल लावल्याने अनुत्तीर्ण झालेल्या दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. चूक लक्षात आल्यानंतर विद्यापीठाने निकालदेखील परत घेतला. या चुकीसाठी जबाबदारांवर काय कारवाई करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.नागपूर विद्यापीठाच्या ‘बीकॉम’ अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाचा बुधवारी निकाल जाहीर झाला. यात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. याबाबत महाविद्यालयातील प्राध्यापकांनी चौकशी केल्यानंतर विद्यापीठाचा हलगर्जीपणा उघड झाला. विद्यार्थ्यांची परीक्षा सात विषयांची झाली होती. यातील सहा विषय प्रत्येकी १०० गुणांचे होते व उत्तीर्ण होण्यासाठी ३५ गुण आवश्यक होते. तर ‘बिझनेस कम्युनिकेशन’ या विषयाचा लेखी पेपर ८० गुणांचा होता व यात उत्तीर्ण होण्यासाठी २८ गुणांची अट होती. परंतु निकाल जाहीर करताना २८ ऐवजी ३५ गुणच उत्तीर्ण होण्यासाठी पकडण्यात आले. त्यामुळे २८ ते ३४ गुण मिळालेले हजारो विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले.यातीलच दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती एका महाविद्यालयातील प्राध्यापकांनी गोपनीयतेच्या अटीवर दिली आहे. या घोळासंदर्भात परीक्षा डॉ.नीरज खटी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी तांत्रिक चूक असल्याचे सांगत वृत्ताला दुजोरा दिला. विद्यापीठाच्या ‘सॉफ्टवेअर’मध्ये अडचण आली. निकालाच्या पहिल्या ५० ‘सॅम्पल्स’मध्ये कुठलीही गडबड नव्हती. परंतु उत्तीर्ण होण्याची आकडेवारी वेगळी असल्यामुळे गोंधळ झाला व हजारहून अधिक विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांचा सुधारित निकाल एक - दोन दिवसात लावण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
विद्यापीठाच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न
By admin | Published: June 24, 2016 3:07 AM