लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापरीक्षा पोर्टल बंद करून सर्व स्पर्धा परीक्षा एमपीएससीमार्फत घेण्यात याव्यात तसेच संयुक्त परीक्षा रद्द करून पूर्वीप्रमाणे स्वतंत्र पीएसआय, एसटीआय आणि असिस्टंटच्या परीक्षा घेण्यात याव्यात आदी मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी रेशीमबागच्या जैन कलार समाज भवनात आमदार बच्चू कडूंच्या नेतृत्वात पदव्या जाळून मुंडन आंदोलन केले.अँन्टी महापरीक्षा पोर्टल समितीच्या वतीने सोमवारी जैन कलार समाज भवन, उमरेड रोड येथे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जैन कलार समाज मंडळाचे अध्यक्ष अनिल अहिरकर प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी बोलताना आ. बच्चू कडू म्हणाले, हा लढा जाती, धर्म वा पंथाचा नाही तर शेतकऱ्यांच्या अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या मुलांचा लढा आहे. शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी हतबल झाला असून दुसरीकडे त्याच्या मेहनत करणाऱ्या मुलांना महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून परीक्षेत भ्रष्टाचार करून अधिकारी होऊ न देण्या
षडयंत्र रचल्या जात आहे. हा विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ आहे. महाराष्ट्र शासनाने महापोर्टलचा भ्रष्टाचार दहा दिवसात बंद करावा, अन्यथा मुंबईत मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशारा त्यांनी दिला. आंदोलनात महापरीक्षा पोर्टल बंद करा, संयुक्त परीक्षा बंद करून स्वतंत्र पीएसआय, एसटीआयच्या परीक्षा घ्याव्या, एमपीएससीने उत्तर पत्रिकेसाठी बारकोड प्रणालीचा वापर करावा, राज्यशासनाने प्रत्येक पदासाठी प्रतीक्षा यादी लावली, तलाठी पदाची परीक्षा एमपीएससीद्वारे घेऊन जास्तीत जास्त पदे भरावीत, १८ हजार शिक्षकांची भरती त्वरित करावी, सहाय्यक वाहन मोटार निरीक्षक नियुक्तीबाबत सर्वोच्च न्यायालयात अपील करून नियुक्त झालेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा आदी मागण्या रेटून धरण्यात आल्या. मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनातील पाच विद्यार्थ्यांनी मुंडन करीत महापरीक्षा पोर्टलच्या दशक्रियेचा विधी पार पाडला. यावेळी आ. कडूंच्या नेतृत्वात रेशीमबाग चौक ते सक्करदरा चौकादरम्यान मोर्चा काढण्यात आला. मोर्चात विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यशस्वितेसाठी प्रशांत काकडे, विनायक तडस, राहुल पोटे यांनी परिश्रम घेतले.