नागपूर : विभागीय शिक्षण मंडळातर्फे दरवर्षी परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याकरिता हेल्पलाईन व समुपदेशकांची नियुक्ती करण्यात येते. विद्यार्थी त्यावर परीक्षेसंदर्भात विचारणा करतात. परंतु यंदा या हेल्पलाईन व समुपदेशकांच्या मोबाईलवर येणारे विद्यार्थ्यांचे कॉल हे अभ्यास झाला नाही, परीक्षा पोस्टपाेंड करा ना... अशी विनंती करणारेच येत आहे. येणारे बहुतांश कॉल हे बाराव्या वर्गातील विद्यार्थ्यांचेच आहे.
राज्य शिक्षण मंडळाने यंदा बोर्डाच्या ऑफलाईन परीक्षा घेण्याचा निर्धार केला आहे. पण दुसरीकडे विद्यार्थ्यांची ओरड परीक्षा पुढे ढकलण्यासाठी होत आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातून विद्यार्थ्यांचे जास्त कॉल या मागणीसाठी येत आहे. २०२१-२२ या शैक्षणिक सत्रात कोरोनाचा अभ्यासाला चांगलाच फटका बसला. ऑनलाईन शिक्षण सुरू होते पण ते फारसे परिणामकारक ठरले नाही. ग्रामीण व दुर्गम भागात तर ऑनलाईन शिक्षण शक्य झाले नाही.
१ फेब्रुवारीपासून शाळा सुरू झाल्या. पण अजूनही विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती नगन्य आहे. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी यंदाही परीक्षा होणार नाही आणि मागच्या वर्षीप्रमाणे आपणही पास होऊ याच मानसिकतेत आहेत. आता परीक्षा आता तोंडावर आल्या आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासाशिवाय पर्याय नाही. अभ्यासाला वेळ कमी असल्याने विद्यार्थी बोर्डाच्या हेल्पलाईन वर अभ्यास झाला नाही, परीक्षा पुढे ढकला अशी विनवणी करीत आहे.
- विद्यार्थ्यांच्या तक्रारी
१) अभ्यास झाला नाही
२) ऑनलाईन शिक्षण समजलेच नाही
३) शाळा बंद असल्याने अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकला नाही
४) पेपर पॅटर्न समजला नाही
५) पेपर सोपा राहील का?
६) पास होवू का?
७) जास्त गुण मिळवायचे आहे?
८) वर्ष वाया जाईल
- श्रेणी सुधारणांची संधी
समुपदेशकाला विद्यार्थ्यांचा कॉल आल्यावर ते स्पष्ट सांगतात परीक्षा पुढे ढकलता येणार नाही, परीक्षा संदर्भातील निर्णय राज्य शिक्षण मंडळ घेते. त्यामुळे आहे तेवढ्या वेळेत अभ्यास करा. कमी गुण मिळाले तर पुन्हा श्रेणी सुधारण्याची संधी तुम्हाला आहे.