मनपा-विद्यापीठात सामंजस्य करार: वर्षभरात ७५० विद्यार्थ्यांना अग्निशमन प्रशिक्षण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील थोर पुरुषांच्या पुतळ्यांची दैनावस्था आहे. मनपाची यासाठी सक्षम अशी यंत्रणा नाही. याचा विचार करता पुतळ्यांची देखभाल करण्याची जबाबदारी राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) विद्यार्थ्यांवर सोपविण्यात आली आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातील एनएसएसचे विद्यार्थी आता नागपूर शहरातील पुतळ्यांची देखभाल करतील. महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेतील मनपाच्या या प्रस्तावाला विद्यापीठाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. महापालिका व नागपूर विद्यापीठात सामंजस्य करार झाला आहे. लवकरच महाविद्यालयांना या जबाबदारीचे वाटप होणार आहे.
यासंदर्भात महापौरांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी महापौर कक्षात बैठक पार पडली. उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, अतिरिक्त आयुक्त संजय निपाणे, उपायुक्त विजय देशमुख, मिलिंद मेश्राम, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजू हिवसे, रासेयोचे संचालक डॉ. सोपान देव पिसे, कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण आदी उपस्थित होते.
मनपा क्षेत्रात ६८ पुतळे आणि १४ स्मारके आहेत. या पुतळ्यांची आणि स्मारकांची देखभाल लोकसहभागातून व्हावी, अशी संकल्पना मांडली. हा प्रस्ताव आपण कुलगुरूंसमोर मांडला. प्रस्तावाला त्यांनी होकार देत विद्यापीठाच्या बैठकीत त्याला मंजुरी दिली. शहरातील पुतळ्यांच्या परिसरात जी महाविद्यालये आहेत, त्यांना पुतळ्यांचे पालकत्व देऊन रासेयोचे विद्यार्थी मनपाच्या अग्निशमन विभाग आणि स्थावर विभागाशी समन्वयन करून पुतळ्यांची निगा राखेल. या मोबदल्यात मनपातर्फे विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल. या उपक्रमात दरवर्षी सहभागी होणाऱ्या सुमारे ७५० विद्यार्थ्यांना मनपाच्या अग्निशमन महाविद्यालयाच्या माध्यमातून अग्निशमन प्रशिक्षण देण्यात येईल.
विद्यापीठांतर्गत असलेल्या चार जिल्ह्यांतील महापालिका, नगरपालिका क्षेत्रातही जर विद्यापीठ असा उपक्रम राबवित असेल तर नागपूर मनपाचा अग्निशमन विभाग तेथील विद्यार्थ्यांनाही प्रशिक्षण देईल, असेही महापौरांनी यावेळी सुचविले.
डॉ. राजू हिवसे यांनी या उपक्रमाचे स्वागत करीत शहरात जेवढे पुतळे आहे, त्या व्यक्तींची माहिती देणारे पुस्तक विद्यापीठातर्फे प्रकाशित करण्याचा मानस व्यक्त केला. प्रारंभी मिलिंद मेश्राम यांनी उपक्रमाची पार्श्वभूमी विशद केली. हा प्रकल्प राबविण्यासाठी मनपा आणि विद्यापीठांच्या अधिकाऱ्यांची समिती स्थापन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.