लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दोन महिन्यांच्या अवकाशानंतर आज शहरातील शाळा चिल्यापिल्यांनी गजबजून गेल्या. शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरावा म्हणून शिक्षण विभागाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे शाळेत प्रवेशोत्सव साजरा झाला. फुगे, फुले, कार्टून, पताका, रांगोळ्यांनी आज शाळा सजल्या होत्या. पहाटेपासूनच शिक्षक मंडळींची प्रवेशोत्सवाची लगबग सुरू झाली होती. एक एक करता विद्यार्थी जमू लागले, विद्यार्थ्यांची किलबिल सुरू झाली. जुन्या मित्रांची पुन्हा गाठभेट झाली. चर्चा रंगल्या, मस्ती सुरू झाली. अशात शिट्टी वाजली, मुलांनी धावत-पळत मैदान गाठले. शाळेची प्रार्थना झाली. वर्ग शिक्षकांनी प्रत्येकाचे पुष्प देऊन स्वागत केले. कुठे मिठाई तर कुठे चॉकलेटने विद्यार्थ्यांचे तोंड गोड केले. प्रवेशोत्सवाचा आनंद विद्यार्थ्यांनी मनमुराद लुटला. सामाजिक उपक्रम राबविलेप्रवेशोत्सवाचा पहिला दिवस आनंदात साजरा करण्याबरोबरच मुलांना सामाजिक जाणीव व्हावी म्हणून सामाजिक उपक्रमही राबविले. काही शाळांनी मुलांच्या हस्ते वृक्षारोपण करून घेतले. व्यसनमुक्तीसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर प्रदूषण आणि स्वच्छतेच्या बाबतीत मार्गदर्शनही केले.प्रार्थना, शिस्त आणि मार्गदर्शनशाळा म्हटले की शिस्तीचा भाग महत्त्वाचा ठरतो. प्रवेशोत्सव असला तरी शाळेमध्ये शिस्त दिसून येत होती. प्रार्थनेसाठी मुले शिस्तीत रांगेत लागली. प्रार्थना झाल्यानंतर नवीन मुलांचा परिचय शाळेने करून घेतला. मुख्याध्यापक, संस्थेचे संचालक यांनी मुलांना अभ्यासाबाबत मार्गदर्शन करीत प्रवेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.विद्यार्थ्यांनी घेतली शपथमनपाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या हस्ते केक कापून, त्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना व्यसनापासून मुक्त राहावे म्हणून शपथ देण्यात आली. प्रसंगी उपस्थित नगरसेविका व झोन सभापती लता काटगाये, क्रीडा सभापती प्रमोद चिखले, समितीच्या अध्यक्ष किरण इंगोले, प्राचार्य रजनी देशकर यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.शाळेत भरल्या पंगती वाडी समूह साधन केंद्रा अंतर्गत उच्च प्रा. शाळा सोनबानगर येथे प्रवेशोत्सवाला विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तर जि.प. उच्च प्रा. शाळा सुराबर्डी येथे विद्यार्थ्यांच्या पंगती भरल्या. पोषण आहारात गोड पदार्थाचा समावेश करण्यात आला. लाव्हा येथेही विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पुस्तकाचे वाटप करण्यात आले. यावेळी पं.स. नागपूरचे उपसभापती सुजित नितनवरे, गटविकास अधिकारी किरण कोवे, केंद्रप्रमुख शरद भांडारकर, सरपंच ज्योत्स्ना नितनवरे, सुनिता मेश्राम, संतोष शेंडे, सुनंदा चोखांद्रे, पुरुषोत्तम गोरे, रामेश्वर मुसळे, अनिल नाईक, रवींद्र टेकाम, प्रभा भिसे, अंजना धांडे आदी उपस्थित होते.
लोकमतने केले स्वागत लोकमतने दरवर्षीप्रमाणे यंदाही विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत केले. या उपक्रमात शहरातील अनेक शाळांनी याला भरभरून प्रतिसाद दिला. लोकमतच्या साक्षीने प्रवेशोत्सवात आणखी बहार आणली.