निशांत वानखेडे
नागपूर : शिक्षक हाेण्यासाठी आवश्यक असलेल्या डी.एड.ची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. दुसऱ्या फेरीनंतरही अत्यल्प प्रवेश झाल्याने विद्यार्थी डी.एड. करण्याबाबत उदासीन आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. याच कारणाने डी.एड. अभ्यासक्रमच बंद पडेल, अशी अफवा पसरत आहे. मात्र डी.एड. बंद हाेणार नसून सध्या ‘अपग्रेडेशन’ सुरू आहे. दाेन वर्षांच्या डी.एड.चे चार वर्षांच्या बी.एड. अभ्यासक्रमात रूपांतर हाेणार आहे, पण गुणवत्तापूर्ण महाविद्यालयांनाच ही संधी मिळणार आहे.
नॅशनल काॅन्सिल फाॅर टीचर्स एज्युकेशन (एनसीटीए) ने जुलै २०२२ मध्ये शिक्षकांच्या अभ्यासक्रमाबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला हाेता. त्यानुसार सध्या सुरू असलेल्या अध्यापक महाविद्यालयांना २०३० पर्यंत पूर्ण सुधारणा करण्याची संधी दिली जाणार आहे. यासाठी एनसीटीएने तज्ज्ञ सदस्यांची एक समिती तयार केली आहे, जी सातत्याने या महाविद्यालयांचे सर्वेक्षण व निरीक्षण करीत राहील. २०३० पर्यंत डी.एड. चे बी.एड. अभ्यासक्रमात रूपांतर केले जाईल, पण जी महाविद्यालये गुणवत्तेत खरे उतरतील, अशाच महाविद्यालयांना अभ्यासक्रम चालविण्याची संधी दिली जाईल, अशी माहिती डी.एड. महाविद्यालयाचे प्राचार्य देवेंद्र काळबांडे यांनी दिली.
खैरातीत वाटलेली ८० महाविद्यालये बंद
विद्यार्थी मिळत नसल्याने गेल्या वर्षी डी.एड.ची ४ महाविद्यालये बंद पडली. विशेष म्हणजे गेल्या सहा-सात वर्षात नागपूर जिल्ह्यातील डी.एड.ची ८० महाविद्यालये बंद पडली आहेत. तज्ज्ञांच्या मते याचे कारण गुणवत्ता आहे. २००८ पर्यंत जिल्ह्यात डी.एड.ची केवळ २८ महाविद्यालये हाेती. त्यावेळी डी.एड.ला प्रचंड मागणी हाेती, तेव्हा अनेकांनी ती सुरू केली. सरकारनेही खैरात वाटल्याप्रमाणे काॅलेजेस दिली. ज्यामुळे २०१५ पर्यंत आकडा १०५ वर गेला. पुढे शिक्षक भरती बंद पडल्याने महाविद्यालयांना घरघर लागली. आज केवळ २७ काॅलेजेस उरली आहेत.
डी.एड., डी.टी.एड, मग डी.एल.एड.
आधी अध्यापक अभ्यासक्रमाचे नाव डिप्लाेमा इन एज्युकेशन म्हणजे डी.एड. असे हाेते. २०१० नंतर त्याचे डिप्लाेमा इन टीचर्स एज्युकेशन (डी.टी.एड.) असे नामकरण झाले. २०१६ नंतर ते डिप्लाेमा इन एलिमेंटरी एज्युकेशन (डी.एल.एड.) असे झाले.
भरमसाट संधी तरीही...
प्राचार्य देवेंद्र काळबांडे यांच्या मते इंजिनिअर, डाॅक्टर हाेणारे विद्यार्थी सरकारी नाेकरीच्या भरवशावर राहत नाहीत. मात्र शिक्षकाची पदवी घेणारा सरकारी किंवा अनुदानित शाळा-महाविद्यालयांचीच अपेक्षा ठेवताे. खरेतर इंग्रजी माध्यमांच्या अनेक काॅन्व्हेंट, शाळा, काॅलेजेस सुरू हाेत आहेत. त्यामध्ये प्रशिक्षित शिक्षकांचीच गरज असते व तसे बंधनकारकही आहे. डी.एड.च्या अभ्यासक्रमात तसे बदल करून नव्या गरजेनुसार प्रशिक्षित करणे गरजेचे आहे, तरच राेजगाराची वानवा राहणार नाही, असे मत काळबांडे यांनी व्यक्त केले.