नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू असला तरी लसीकरणापासून लहान मुलांना तूर्तास समाविष्ट करण्यात आले नाही. परंतु, पुढील चार महिन्यांत लहान मुलांसाठी लस उपलब्ध होण्याचे संकेत मिळाले आहेत. विशेष म्हणजे, याची मानवी चाचणी लवकरच उपराजधानीतील एका खासगी रुग्णालयात सुरू होणार आहे. यामुळे जून महिन्यात लस उपलब्ध होऊन नव्या शैक्षणिक वर्षांत विद्यार्थी लस घेऊनच शाळेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.
कोरोनाचा ११ महिन्यांनंतर ८ जानेवारीपासून मनपाच्या हद्दीतील पाचवी ते आठव्या वर्गातील शाळा सुरू होत आहेत. परंतु, मुलांना शाळेत पाठविताना पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मुलांना कोरोना प्रतिबंधक लसीचे संरक्षण मिळाले असते तर भीती राहिली नसती, अशा पालकांच्या भावना आहेत. या धर्तीवर भारत बायोटेक या कंपनीने २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोव्हॅक्सिन लसीची निर्मिती करण्याची तयारी सुरू केली आहे. लहान मुलांवरील चाचणीसाठी नागपुरातील काही खासगी ‘चाईल्ड हॉस्पिटल’ने पुढाकार घेतला आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचणीसाठी नागपूर महत्त्वाचे केंद्र ठरले आहे. याची सुरुवात नागपुरातील गिल्लूरकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमधून झाली. पहिला व दुसरा टप्पा मिळून १०५ स्वयंसेवकांना लस देण्यात आली. त्यानंतर सीए रोडवरील रहाटे हॉस्पिटलमध्ये १६०० स्वयंसेवकावर मानवी चाचणीचा टप्पा यशस्वी पार पडला. आता लवकरच नाकाद्वारे घेण्यात येणाऱ्या लसीची मानवी चाचणी सुरू होणार आहे. ‘सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ची ‘कोविशिल्ड’ लसीची मानवी चाचणी मेडिकलमध्ये सुरू असून, ५० स्वयंसेवकांना पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे. यामुळे लहान मुलांवरील चाचणीची प्रतीक्षा होती तेही आता लवकरच संपुष्टात येणार आहे.
-तीन वयोगटात चाचण्या
तज्ज्ञाने दिलेल्या माहितीनुसार, लहान मुलांमध्ये कोव्हॅक्सीनची मानवी चाचणी तीन वयोगटात विभागली जाईल. यात २ ते ५ वर्षे, ६ ते १२ वर्षे व १३ ते १८ वर्षे वयोगटात चाचण्या घेतल्या जातील. यासाठी विशेष प्रोटोकॉल पाळला जाईल.