लाेकमत न्यूज नेटवर्क
नरखेड : काेराेना संकटामुळे सर्वांचीच आर्थिक घडी विस्कटली आहे. लाॅकडाऊनमुळे ग्रामीण भागातील व्यवसाय व उद्याेग ठप्प असल्याने सर्वसामान्यांना आर्थिक समस्यांना सामाेरे जावे लागत आहे. त्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधा व इतर बाबींवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करावे, अशी मागणी पालकांनी केली आहे. यासंदर्भात पालकांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डाॅ. संजय दुधे यांच्याकडे निवेदन साेपविले आहे.
मागील वर्षात पालकांनी ओढताण करीत आपल्या पाल्यांच्या गरजा पूर्ण केल्या. काेराेना जाईल व विस्कटलेली आर्थिक घडी पूर्वपदावर येईल, अशी आशा असतानाच दुसऱ्या लाटेत काेराेनाने विक्राळ रूप घेत नागरिकांच्या आर्थिक अडचणीत भर टाकली. आराेग्यविषयक समस्येसह अनेकांना काैटुंबिक भरणपाेषणाचा गंभीर प्रश्न उभा ठाकला. अशावेळी परीक्षा अर्ज भरण्याबाबत महाविद्यालयांनी सूचना देऊनही ५० टक्के विद्यार्थी परीक्षा अर्ज भरत नसल्याचे दिसून आले. यात पालकांची आर्थिक परिस्थिती कारणीभूत ठरत आहे.
विद्यापीठ ऑनलाईन परीक्षा घेत असताना, यामध्ये माेठ्या प्रमाणात खर्च येत नसताना संकटकाळात विद्यार्थ्यांवर आर्थिक भुर्दंड का, असा प्रश्न पालकांची उपस्थित केला आहे. विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करावे. घेतलेले परीक्षा शुल्क परत करावे. महामारीचे संकट नियंत्रणात येईस्ताेवर विद्यापीठाने नाममात्र परीक्षा शुल्क घेऊन परीक्षा घेण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनातून केली आहे. निवेदन देताना पालकांच्या शिष्टमंडळात चंद्रशेखर मसराम, लीलाधर कळंबे, धनराज भोयर, अनिकेत सावंत, पद्मा पंचभाई, गणेश उपासे, विवेक बालपाडे, गणेश उईके, राहुल धुर्वे, हेमंत वघाळे आदींचा समावेश हाेता.