लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपल्या आसपास व जगात सर्वत्र घडणाऱ्या गूढ गोष्टींचा उलगडा विज्ञानाने केला आहे. मात्र हेच विज्ञान अभ्यासक्रमात आले की हा विषय म्हणजे बहुतेक विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत वाटते. विज्ञान म्हणजे ‘सर्कस’असाच काहीसा समज विद्यार्थ्यांचा होतो. मात्र ही विज्ञानाची सर्कस अतिशय सोपी व्हावी आणि विद्यार्थ्यांनी स्वत: सहभाग घेऊन करावी व हसतखेळत ती अनुभवावी, असा स्तुत्य उपक्रम सीताबर्डीच्या सेवासदन हायस्कूलतर्फे बुधवारी राबविण्यात आला.आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या गोष्टी आपण पाहतो, अनुभवतो. मात्र त्या का व कशा घडतात, याचे उत्तर भल्याभल्यांना सांगता येत नाही. विद्युत तयार होण्याचे गुणधर्म, ग्रहमालेत सर्व ग्रह, उपग्रह सुरळीतपणे कसे फिरतात? एकच पृथ्वी असताना एका भागात दिवस आणि दुसऱ्या भागात रात्र कशी होते? नुसत्या टाळ्या वाजविल्या की विजेचा दिवा सुरू आणि बंद कसा होतो? सारखेच दिसणाऱ्या वेगवेगळ्या आरशात अनेक प्रकारच्या प्रतिमा कशा उमटतात? चक्रीवादळ कसे निर्माण होते? सौर ऊर्जा म्हणजे काय आणि सोलर पॅनलद्वारे ती कशी तयार होते? मानवासह सर्व सजीव प्राण्यांचे शरीर ज्या ‘डीएनए’मुळे तयार झाले आहे, ते डीएनए म्हणजे नेमके काय? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे अतिशय सोप्या प्रयोगातून समजविण्याचा प्रयत्न ‘सायन्स सर्कस’मध्ये करण्यात आला. एलईडी बल्बच्या साह्याने एखादा बोगदा अनंत असल्यासारखा का वाटतो, हा प्रयोग पाहणाऱ्यांना अचंबित करून जातो.सेवासदनचे शिक्षक शैलेश बोईनवार यांनी सांगितले, हे एकप्रकारचे विज्ञान प्रदर्शन आहे, मात्र त्याचे स्वरूप वेगळे आहे. विज्ञानाच्या मूलभूत संकल्पना विद्यार्थ्यांना हसतखेळत समजाव्यात म्हणून लहान लहान प्रयोगातून त्या सादर केल्या आहेत. यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणिताचेही ६० प्रयोग सादर करण्यात आले असून, सेवासदनचे ५ वी ते १२ व्या वर्गाचे ६०० च्यावर विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सादरकर्ते विद्यार्थीच प्रयोग करू शकतील असे नाही तर प्रदर्शन पाहायला आलेले विद्यार्थीसुद्धा यामध्ये सहभाग घेऊन प्रयोग करून पाहू शकत होते, हा या आयोजनाचा विशेष भाग होता. सेवासदनच्या मुख्याध्यापिका हेमलता अकर्ते यांच्या मार्गदर्शनात प्रदीप भुते, अजय चव्हाण, शैलेश बोईनवार व इतर शिक्षकांच्या सहकार्याने हे आयोजन करण्यात आले. शहरातील अनेक शाळांच्या शेकडो विद्यार्थ्यांनी भेट देऊन ही सायन्स सर्कस अनुभवली.
विद्यार्थ्यांनी अनुभवली ‘सायन्स सर्कस’ : कठीण संकल्पनांचा हसतखेळत उलगडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 12:48 AM
आपल्या आसपास व जगात सर्वत्र घडणाऱ्या गूढ गोष्टींचा उलगडा विज्ञानाने केला आहे. मात्र हेच विज्ञान अभ्यासक्रमात आले की हा विषय म्हणजे बहुतेक विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत वाटते. विज्ञान म्हणजे ‘सर्कस’असाच काहीसा समज विद्यार्थ्यांचा होतो. मात्र ही विज्ञानाची सर्कस अतिशय सोपी व्हावी आणि विद्यार्थ्यांनी स्वत: सहभाग घेऊन करावी व हसतखेळत ती अनुभवावी, असा स्तुत्य उपक्रम सीताबर्डीच्या सेवासदन हायस्कूलतर्फे बुधवारी राबविण्यात आला.
ठळक मुद्देसेवासदन हायस्कूलचा स्तुत्य उपक्रम