नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात भारतीय प्रागैतिहासिक वैभवावर दोन दिवसीय प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. मानव उत्क्रांतीचा इतिहास या प्रदर्शनीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अनुभवला. विद्यापीठाचा प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्व विभाग आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग नागपूर मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते.प्रदर्शनीचे उद्घाटन कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या शुभ हस्ते झाले. यावेळी पेंच वन्यजीव विभागाचे क्षेत्र संचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ला, प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्व विभाग डॉ. प्रबास साहू, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग नागपूरचे पुरातत्त्वविद अरुण मलिक, सहायक पुरातत्त्वविद शरद गोस्वामी, भारतीय मानव विज्ञान सर्वेक्षण विभागाचे संचालक निलांजन खटुआ, सहसंचालक राजकिशोर मोहतो यांची उपस्थिती होती.मानवाच्या निर्मिती ते उत्क्रांती विकास प्रक्रियेतील चार्ट या ठिकाणी प्रदर्शित करण्यात आला होता. मानवाने उत्क्रांतीदरम्यान उपयोग केलेले विविध उपकरण चार्टच्या माध्यमातून दाखविण्यात आले. पाषाणकालीन, मध्य पाषाण, नव पाषाण या तीनही युगातील विविध वस्तू प्रदर्शनीत ठेवण्यात आल्या होत्या. या प्रदर्शनीमध्ये संपूर्ण भारतातील शिल्प चित्रकला प्रदर्शित करण्यात आली. पाषाणकाला नंतरची शैल चित्रकला विद्यार्थ्यांना आकर्षित करीत होती. सोबतच भंडारा जिल्ह्यातील बावनथडी, चंद्रपूर जिल्ह्यातील नगर गोटा, अमरावती जिल्ह्यातील गाविलगड इत्यादी विविध ठिकाणातील शैल चित्रकला या प्रदर्शनीचे आकर्षण ठरले होते. प्रदर्शनीच्या निमित्ताने विभागातील विद्यार्थ्यांनी स्वतःहून पाषाणकालीन झोपडीचे निर्माण केले होते. ही झोपडी येणाऱ्या सर्वांचे लक्ष आकर्षित करीत होती. सोबतच या निमित्ताने विभागातील पुरातत्त्व अवशेषाचे प्रदर्शन यावेळी करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी अनुभवला मानव उत्क्रांतीचा इतिहास, भारतीय प्रागैतिहासिक वैभवावर विद्यापीठात प्रदर्शनी
By जितेंद्र ढवळे | Published: January 06, 2024 4:26 PM