बोर्डाचा सल्ला : शहरभर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाने वाढवली चिंता नागपूर : दहावी-बारावीची परीक्षा लवकरच सुरू होणार आहे. या परीक्षेने शिक्षण मंडळाची चिंता वाढवली आहे आणि या चिंतेला कारणीभूत ठरले आहे शहरभर सुरू असलेले रस्त्याचे बांधकाम. अशा बांधकामांमुळे अनेक रस्त्यांवर वारंवार वाहतूक अवरुद्ध होत आहे तर काही रस्त्यांची वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात आली आहे. अशा स्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचायला उशीर होऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेला येताना किमान एक तास आधी घरातून बाहेर पडावे, असा सल्ला शिक्षण बोर्डाच्या नागपूर विभागीय कार्यालयाचे विभागीय सचिव श्रीराम चव्हाण यांनी दिला आहे. शहरभर सुरू असलेले रस्त्याचे बांधकाम आणि वाहतूक वळवण्यात आल्यामुळे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनाही कार्यालयात पोहोचताना उशीर होत आहे. परीक्षेच्या काळात याचा फटका विद्यार्थ्यांनाही बसू शकतो, ही शक्यता लक्षात घेता त्यांना घरून लवकर निघण्याचा सल्ला देण्यात आला आहे. असा सल्ला देण्यामागे दुसरे एक कारणही आहे. परीक्षेच्या काळात अनेकदा ऐन वेळेवर विद्यार्थ्यांचे आसन व्यवस्थेत बदल केले जातात. अशावेळी विद्यार्थी गोंधळतात व त्याचा प्रभाव ते देत असलेल्या पेपरवर पडतो. त्यामुळे हा गोंधळ टाळण्यासाठीही विद्यार्र्थ्यांना लवकर परीक्षा केंद्रावर येण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांनो, परीक्षेसाठी तासभर आधी घरून निघा
By admin | Published: February 26, 2017 2:35 AM