नागपूर : व्यंजनप्रिय आपल्या देशाप्रमाणे खानपानाचे असंख्य प्रकार जगात कुठेही सापडणार नाहीत. त्यातील प्रत्येक पदार्थ तोंडाला पाणी सोडणारा असतो पण खायला आवडणारे हे पदार्थ प्रत्येकाला बनविता येतीलच असे नाही. मात्र प्रत्येक क्षेत्रात शिरकाव केलेल्या तंत्रज्ञानाने पाककलाही सोपी केली आहे.
दक्षिण भारतातून देशभरात लोकप्रिय झालेला डोसा विशिष्ट स्टाईलने तयार करण्यात येतो. नागपूरच्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी एक इलेक्ट्रिक मशीन तयार केली आहे ज्यावर अगदी काही मिनिटात डोसा तयार करणे शक्य होते.
रमण विज्ञान केंद्राच्या रमण इनोव्हेशन उपक्रमाद्वारे अंजुमन अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी केंटिया व्ही-५' ही इलेक्ट्रिक मशीन तयार केली आहे. केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश अशा दाक्षिणात्य राज्यांचा प्रमुख या विद्या खाद्यपदार्थ असलेला डोसा देशविदेशातही पसंत केला जातो. फरहान अली सत्तार अली, मोहम्मद ओवैस अंसारी, दुर्रानी मोहम्मद दानिश, अली मोहम्मद हैदरी, अजहर फारुक सुभेदार व शुभम सिंह या विद्यार्थ्यांनी ही इलेक्ट्रिक मशीन तयार केली आहे.
सहायक प्राध्यापक जव्वाद अहमद लोढी आणि मेंटॉर डॉ. प्रीती तायंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी रमण विज्ञान केंद्राच्या प्रयोगशाळेत हा प्रयोग यशस्वीपणे पूर्ण केला. केंद्राचे शिक्षक विलास चौधरी यांनी मशीन तयार करण्यास आवश्यक साहित्याबाबत मार्गदर्शन केले.
पाककृतीचा अभ्यास करून तयार केली मशीन
- डोसा तयार करण्यास वेळ लागत असल्याने घरी करण्यास ब्रासदायक व कठीण ठरतो आणि तयार केलाही तरी तो तेवढाच चवदार होईल, याची गॅरंटी नाही.
- मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या मशीनवर अगदी काही मिनिटात अगदी चवदार डोसा तयार करता येईल.
- मशीन निर्मिती तंत्रज्ञानासह डोसा तयार करण्याच्या पाककृतीचा अभ्यास करून विद्यार्थ्यांनी ही अनोखी मशीन तयार केली आहे.
- फेब्रुवारी २०२० मध्ये रमण विज्ञान केंद्राच्या विज्ञान महोत्सवात या प्रकल्पाला पुरस्काराने गौरविण्यात आले. मुलासोबत आलेल्या अनेक गृहिणीनी ही डोसा मशीन बाजारात उपलब्ध करण्याबाबत मागणी केली.