लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील काही काळापासून ऑनलाइन व्यवहारांचे प्रमाण वाढले असून, गुन्हेगारांची या क्षेत्राकडे नजर आहे. सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषत: विद्यार्थी व तरुण हे सायबर गुन्हेगारांच्या टार्गेटवर असतात. त्यामुळे त्यांच्या या संदर्भात जागरूकता निर्माण करणे आवश्यक असल्याचे मत विविध सायबर तज्ज्ञांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे ‘उच्चशिक्षण संस्थांमध्ये सायबर जागरूकता आणि सायबर शिस्त’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
यावेळी पोलीस उपमहासंचालक संदीप पाटील, कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी, पोलीस उपायुक्त विनिता साहू, प्र-कुलगुरू डॉ.संजय दुधे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक बागुल प्रामुख्याने उपस्थित होते. सायबर गुन्ह्यांचे प्रमाण बघता, शासनाने सर्व जिल्ह्यांमध्ये सायबर पोलीस स्टेशन तयार केलेले आहेत. मात्र, तरुणांमध्ये याविषयी जागरूकता निर्माण करणे आज काळाची गरज असल्याचे आवाहन संदीप पाटील यांनी केले. ऑनलाइन वर्गांमुळे लहान मुलेही इंटरनेट वापरत आहेत. त्यांना लहानपणापासून सायबर गुन्ह्यांची माहिती दिली पाहिजे, असे प्रतिपादन विनिता साहू यांनी केले. आज जगाच्या कोपऱ्यात कुठेही बसून ऑनलाइन चोरी होऊ शकते. त्यामुळे सायबर जागरूकता ही काळाची गरज असल्याचे मत डॉ.सुभाष चौधरी यांनी व्यक्त केले. समाज माध्यमांवर वावरताना तरुणाईने सावध असले पाहिजे. अज्ञानातून कुणाकडूनही गुन्हा होऊ शकतो, याची जाण ठेवायला हवी, असे अशोक बागुल म्हणाले. उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक डॉ.प्रफुल्ल साबळे यांनी केले.