लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पुढील शैक्षणिक सत्रात १ जुलै रोजी शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या सर्व शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी, अनुदानित अशा जिल्हा परिषदेच्या सर्वच शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके मिळणार आहे. यात जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एक लाख ५४ हजार विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके योजनेचा लाभ मिळणार आहेत. १५ मे पासून बालभारतीतून तालुकास्तरावर पाठ्यपुस्तके पाठविण्याला सुरूवात होणार असल्याची माहिती आहे.
शासनाच्या समग्र शिक्षा अभियानअंतर्गत दरवर्षी १ ली ते ८ वीच्या मुलांना मोफत पुस्तके दिली जातात. शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांच्या हाती मोफत पुस्तके मिळावीत. मुलांची गैरसोय होऊ नये यासाठी शिक्षण विभागाकडून गेल्या काही दिवसांपासून नियोजन करुन बालभारतीकडे पुस्तकासाठी आॅनलाईन नोंदणीही करण्यात आली होती. जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून इयत्ता १ ते ८ च्या १ लाख ५४ हजार ३२ वर विद्यार्थ्यांसाठी एकात्मिक पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत पाठ्य पुस्तकांची नोंदणी गत फेब्रुवारी महिन्यातच बालभारतीकडे नोंदविण्यात आली आहे.
शाळांनी भरलेल्या युडाएस डाट्यानुसार इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत ९३ हजार ७८ विद्यार्थी, पाचवी ते आठवीपर्यंत ६० हजार ९५४ असे एकूण १ लाख ५४ हजार ३२ विद्यार्थ्यांची आॅनलाईन नोंदणी करण्यात आली. शाळांना मागणीनुसार पाठ्यपुस्तकांचे वितरण होणार आहे. तालुकास्तरावर पाठ्यपुस्तकाच्या वितरणाची जबाबदारी गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आली असून, त्यांच्या मार्फत मागणीप्रमाणे पाठ्यपुस्तकाची उचल बालभारतीकडून करण्यात येणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार १५ मे २०२४ पासून बालभारतीच्या बुटीबोरी डेपोतून पुस्तकाची उचल करुन त्याचे तालुकास्तरावर वितरणही करण्यात येणार आहे.