लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कवी बा. सी. मर्ढेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या स्नातकोत्तर मराठी विभागाने शनिवारी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आभासी माध्यमाद्वारे पार पडलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मर्ढेकरांच्या वैविध्यपूर्ण कवितांचे वाचन केले.
विभागप्रमुख डॉ. प्रमोद मुनघाटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विनिता हिंगे उपस्थित होत्या. मर्ढेकरांची कविता हीच नवकाव्याची व्याख्या होती. त्यांनी आपल्या कवितेतून स्वत:चे सौंदर्यशास्त्र सिद्ध केले आणि म्हणूनच मर्ढेकरांची कविता ही युगकविता ठरते, असे मत डॉ. हिंगे यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी संयोजक डॉ. प्रमोद लेंडे खैरगावकर यांनी काही कविता सादर केल्या. शीला गजभिये, प्रियंका भोंगरे, तेजस्विनी मानकर, सुनयना निंबेकर, वसुंधरा देशपांडे, नारायणी शेंडे, मोनिका नेवारे यांनी मर्ढेकरांच्या कवितांचे वाचन केले. यावेळी डॉ. अमृता इंदूरकर, डॉ. हेमराज निखाडे, प्रा. सुजित जाधव, डॉ. प्रज्ञा निनावे, प्रा. उमेश डोंगरवार उपस्थित होते.
....................