नागपूर : लोकमत कॅम्पस क्लब व मेजर हेमंत जकाते विद्यानिकेतनतर्फे (एम.एच.जे.) विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी व स्वत:च्या हाताने गणेशाची मूर्ती साकारण्याचा आनंद देण्यासाठी इको फ्रेण्डली गणेश मेकिंग वर्कशॉपचे आयोजन केले होते. म्हाळगीनगर चौक, रिंगरोडवरील मेजर हेमंत जकाते विद्यानिकेतनमध्ये झालेल्या या वर्कशॉपमध्ये सहभागी झालेल्या ७० विद्यार्थ्यांनी आकर्षक गणेशाच्या मूर्ती साकारल्या.
ऐश्वर्या हॉबी क्लासेस ॲण्ड आर्ट गॅलरीच्या जया गुप्ता यांनी कार्यशाळेत सहभागी झालेल्या मुलांना बेसिक गणपतीच्या मूर्ती साकारण्याचे प्रशिक्षण दिले. विद्यार्थ्यांनी आणलेल्या शाडू मातीला प्रशिक्षकांनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शनानुसार आकार द्यायला सुरुवात केली. मुलांनी या वर्कशॉपच्या माध्यमातून मातीशी खेळताना गणपतीचे वेगवेगळे रूप साकारले. एक संपूर्ण गणेशमूर्ती तयार झाल्यावर मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झाला होता. या कार्यशाळेला मुख्य अतिथी म्हणून मेजर हेमंत जकाते विद्यानिकेतनच्या संचालक शीला मुडे, प्राचार्य मधुसूदन मुडे उपस्थित होते.