लाेकमत न्यूज नेटवर्क
देवलापार : राज्यशास्त्र या विषयाचा शालेय पाठ्यक्रमात समावेश करण्यात आला आहे. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रियेची माहिती व्हावी म्हणून देवलापार येथील स्वामी विवेकानंद विद्यालयात वर्ग नायक पदासाठी नुकतीच निवडणूक घेण्यात आली. यात उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून तर मतमाेजणीपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आली. शिवाय, विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्कही बजावला.
शालेय अभ्यासक्रमात इयत्ता नववीपासून राज्यशास्त्र या विषयाचा समावेश करण्यात आला आहे. आजचे विद्यार्थी उद्याचे मतदार आहेत. त्याच अनुषंगाने हा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती नवव्या वर्गाचे वर्गशिक्षक उल्हास इटनकर यांनी दिली. उल्हास इटनकर यांनी ही निवडणूक घेण्यासंदर्भात मुख्याध्यापक जगन्नाथ गराट व पर्यवेक्षक जयंत देशपांडे यांच्याशी आधी चर्चा केली. त्यांनी परवानगी देताच उल्हास इटनकर यांनी निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम तयार केला.
त्याअनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी जयंत देशपांडे यांनी इयत्ता नववी (क) च्या वर्गनायक पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. उमेदवारांनी त्यांच्या उपस्थितीत नामनिर्देशन पत्र भरले. प्राप्त अर्जांची छाननी करण्यात आल्यानंतर २७ ऑगस्ट राेजी मतदान घेण्यात आले. वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर १ सप्टेंबरला मतमाेजणी करण्यात आली.
यात वर्गनायिकापदी सलोनी गुप्ता, उपवर्गनायिकापदी प्राची बिनझाडे, वर्गनायकपदी राहुल उईके व उपवर्गनायकपदी अक्षत गुप्ता विजयी झाल्याचे मतमाेजणीच्या सर्व फेऱ्या आटाेपल्यानंतर जाहीर करण्यात आले. मतदान केंद्राध्यक्ष म्हणून मनोज चंदेल तर मतदान अधिकारी म्हणून संजय उईके, रजनीश कोडापे व माया कोहळे यांनी जबाबदारी पार पाडली.