महाराष्ट्रदिनी विधायक आयोजन : शासकीय विज्ञान संस्थेतील विद्यार्थी होणार सहभागी नागपूर : एरवी राज्याच्या विकासाचा आराखडा तयार करताना मोठमोठे तज्ज्ञ, उद्योजक, राजकारणी, सनदी अधिकारी यांचे मत विचारात घेण्यात येते. मात्र महाराष्ट्र दिनाच्या औचित्यावर एका विधायक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून नागपूरसह राज्यभरातील विद्यार्थी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच विकासासंदर्भातील नवनवीन कल्पना मांडतील. नागपुरातील शासकीय विज्ञान संस्थेतील विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे नागपूरकर विद्यार्थी मुंबईत जाऊन थेट मुख्यमंत्र्यांसमोर आपले विचार मांडण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे. महाराष्ट्र दिनानिमित्ताने १ मे रोजी मुंबईमध्ये ‘एनएससीआय’ मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री विद्यार्थी, विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ यांचे विचार जाणून घेणार आहेत. राज्यातील १०० हून अधिक शहरांमधून विद्यार्थी सहभागी होणार आहेत; शिवाय महाराष्ट्राच्या प्रगतीच्या कल्पना मांडणारे विशेष प्रदर्शनदेखील मांडण्यात येणार आहे. या कार्यक्रमात शासकीय विज्ञान संस्थेच्या सहा विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. हे विद्यार्थी मुख्यमंत्र्यांसमोर राज्याच्या विकासाविषयी आपल्या कल्पना मांडतील. या विद्यार्थ्यांमध्ये वैभव चिचमलकर, अम्रीता पवित्रण, अनुराग गेचुडे, मीनल सोनवणे, क्रिष्णेंदू रॉय आणि स्वाती अय्यर यांचा समावेश असल्याची माहिती डॉ. सुजाता देव, डॉ. अभय खांबोरकर, डॉ. रामदास लिहितकर यांनी दिली. नागपूर शहरासाठी ही अभिमानाची बाब असून या उपक्रमातून राज्याला विधायक विचार मिळतील, असे मत संस्थेचे संचालक डॉ. रामदास आत्राम यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)
विद्यार्थी मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार विकासाचा ‘रोडमॅप’
By admin | Published: April 26, 2017 1:50 AM