लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शासकीय दंत महाविद्यालयाच्या (डेंटल) मुलांच्या वसतिगृहातील ३६ पैकी २७ खोल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या (एम्स) विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्याने विद्यार्थ्यांसमोर निवासाचा प्रश्न उभा ठाकला आहे. याला घेऊन विद्यार्थ्यांनी न्यायालयाचे दार ठोठावले असताना याच महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहातील समस्यांनी तोंडवर काढले आहे. गेल्या २० दिवसांपासून पाण्याच्या समस्येकडे कुणीच लक्ष देत नसल्याचे पाहून विद्यार्थिनींसह विद्यार्थ्यांनी गुरुवारी बादल्या, पाण्याच्या बॉटल्स घेऊन अधिष्ठाता कक्षासमोरच ठिय्या आंदोलन केले.विशेष म्हणजे, पाण्यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या महाविद्यालयाकडे गेले. वैद्यकीय शिक्षण सचिवांपासून ते संचालकापर्यंत सर्वांनी याची दखल घेतल्याचे बोलले जात आहे. सायंकाळी वरिष्ठ प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांची समजूत काढल्यानंतर व पाणी समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर मुलांनी आंदोलन मागे घेतले.दंत रुग्णांसाठी शासकीय दंत रुग्णालय एक आशेचा किरण ठरले आहे. या रुग्णालयात केवळ विदर्भातीलच नव्हे तर आजूबाजूच्या राज्यातून रुग्ण येतात. रुग्णसेवेचा दर्जा सांभाळला जात असला तरी मुलामुलींच्या वसतिगृहातील समस्यांकडे महाविद्यालय प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे येथील विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. ‘लोकमत’शी बोलताना विद्यार्थिनी म्हणाल्या, मुलींच्या वसतिगृहाच्या क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थिनी ठेवल्या जातात. यातच गेल्या दोन महिन्यापासून वसतिगृहात पाणी समस्या आहे. तिसऱ्या वर्षातील विद्यार्थिनींची परीक्षा सुरू असताना अनेक विद्यार्थिनी विना आंघोळ परीक्षेला जायच्या. तिकडून आल्यावर केवळ एक बादली पाणी मिळायचे. त्या स्थितीतही मुलींनी दिवस काढले. रुग्णालय प्रशासनाला याबाबत तीनदा पत्रही दिले. परंतु कुणीच दखल घेतली नाही. २० दिवसांपूर्वी ‘आरओ’ यंत्र नादुरुस्त झाले. पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला. मुलींनी बाहेरून पाण्याच्या कॅन विकत घेतल्या. परंतु या पाण्याने अनेकींना घशाचे विकार झाले. नाईलाजाने व आर्थिक भूर्दंड सहन करूनही आजही हे पाणी वापरले जात आहे. वापरण्याचे पाणीही उपलब्ध होत नसल्याने मुलांच्या वसतिगृहातून पाईप जोडून रात्री १२ वाजता मुली आपल्या बादल्या भरून पाण्याची व्यवस्था करतात. यातच दोन-चार दिवसांपूर्वी महाविद्यालय प्रशासनाने एकतर वापरण्यासाठी पाणी मिळेल किंवा पिण्यासाठी असा इशारा दिल्याने हे ठिय्या आंदोलन केले. २४ तास मुबलक पाणी द्या, प्रत्येक वॉटर कुलरला ‘प्युरीफायर’ यंत्र लावा व किमान स्वच्छता गृहाची नियमित स्वच्छता करा, एवढीच आमची मागणी आहे.पाण्यासाठी विद्यार्थी अधिष्ठात्यांच्या कक्षालाच घेराव घालून बसले होते. अधिष्ठाता डॉ. सिंधू गणवीर परीक्षा घेण्यासाठी दिल्लीला असल्याने त्यांनी ज्या प्राध्यापकांवर जबाबदारी दिली होती त्यांनासुद्धा कक्षाकडे जाऊ देत नव्हते. बादली, पाण्याच्या बॉटल घेऊन विद्यार्थी सायंकाळी ७ वाजेपर्यंत बसून होते.पाणी समस्या निकाली काढणारमुलींच्या वसतिगृहातील पाणी समस्या निकाली काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या आजच्या आंदोलनाला गंभीरतेने घेत तातडीने एका वॉटर कूलरला ‘प्युरीफायर’ यंत्र बसविण्यात आले. उर्वरित तीन वॉटर कूलरलाही हे यंत्र लवकरच बसविण्यात येईल. डॉ. सिंधू गणवीरअधिष्ठाता, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय.