राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा सल्ला : सकारात्मक बदलांसाठी प्रयत्न करानागपूर : आजच्या तारखेत तंत्रज्ञानात किंचितही स्थिरता नसून यातील बदलांचा भन्नाट वेग थक्क करणारा आहे. त्यामुळे या बदलांशी एकरूप होऊन प्रगती करण्यासाठी अभ्यास ही निरंतर प्रक्रिया ठरणार आहे. या वेगामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी स्वत:ला सदैव ‘अपडेट’ ठेवा, असा सल्ला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी विद्यार्थ्यांना दिला. ‘व्हीएनआयटी’च्या (विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) १३ व्या दीक्षांत समारंभादरम्यान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी विद्यार्थ्यांना आयुष्यासाठी शिदोरी ठरतील असे मौलिक सल्ले दिले.राष्ट्रपती प्रणव मुखर्जी म्हणाले, आजच्या तारखेत ज्ञानासोबतच कौशल्यालादेखील महत्त्व आहे. त्यामुळे बदलते तंत्रज्ञान आत्मसात करताना कौशल्य विकासावरदेखील भर दिला पाहिजे. यातूनच समाज व देशाला प्रगतीच्या शिखरावर नेता येईल. तंत्रज्ञान हे दुधारी तलवारीसारखे आहे. याचा उपयोग मानवजातीच्या कल्याणासाठीच झाला पाहिजे. या कार्यक्रमाला राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी तसेच शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात खासदार अजय संचेती, महापौर प्रवीण दटके, विभागीय आयुक्त अनुपकुमार, महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मोहन खेडकर, महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आदित्यकुमार मिश्रा, तंत्रशिक्षण संचालनालयाचे विभागीय सहसंचालक गुलाबराव ठाकरे यांचा समावेश होता.
विद्यार्थ्यांनो ‘अपडेट’ राहा
By admin | Published: September 16, 2015 3:27 AM