लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विद्यार्थ्यांकडून पालकांच्या अपेक्षा डॉक्टर अथवा इंजिनीअर होण्याच्या असल्या तरी, विद्यार्थ्यांचा कल गणवेशधारी सेवेकडे वाढल्याचा दिसतो आहे. राज्य शिक्षण मंडळातर्फे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या घेण्यात आलेल्या कल चाचणीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात विद्यार्थ्यांचा कल इंजिनीअरिंग व मेडिकलच्या तुलनेत कॉमर्स व ललित कला विषयाकडे वाढल्याचा दिसतो आहे. उच्च शिक्षण घेतल्यानंतर ३० टक्के विद्यार्थ्यांनी गणवेशधारी सेवेत जाण्याची इच्छा दर्शविली आहे.नागपूर विभागात १ लाख ६१ हजार ९६५ विद्यार्थ्यांची कल चाचणी झाली. नागपूर विभागातील विद्यार्थ्यांचा कल हा इंजिनीअरिंग अभ्यासक्रमाकडे कमी होताना दिसतो आहे. शैक्षणिक सत्र २०१७-१८ मध्ये इंजिनीअरिंगकडे १५.५० टक्के विद्यार्थी वळले होते. परंतु या वर्षात केवळ ९.५० टक्के विद्यार्थ्यांनी आपला कल इंजिनीअरिंगकडे दिला आहे. मेडिकलसाठी गेल्या वर्षी १०.९७ टक्के विद्यार्थ्यांचा कल होता. तो यावर्षीही सारखाच आहे. पण या अभ्यासक्रमाच्या तुलनेत विद्यार्थ्यांनी कॉमर्स अभ्यासक्रमाला विशेष पसंती दर्शविली आहे. चाचणीच्या अहवालात ३२ टक्के विद्यार्थ्यांचा कल हा कॉमर्सकडे आहे. दुसऱ्या क्रमांकावर ललित कला विषयाचा अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल आहे. मानव्यशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमालासुद्धा विद्यार्थ्यांनी पसंती दर्शविली आहे.सात क्षेत्रासाठी विद्यार्थ्यांची कल चाचणीकृषी, कला, मानव्यशास्त्र, कॉमर्स, ललित कला, मेडिकल, बायोसायन्स, इंजिनीअरिंग व टेक्नॉलॉजी व गणवेशधारी सेवेचा यात समावेश होता. पहिल्यांदा मोबाईलवर विद्यार्थ्यांची टेस्ट घेण्यात आली. अहवालानुसार ही स्थिती संपूर्ण राज्याची आहे.इंजिनीअरिंग व टेक्नालॉजीच्या कॉलेजची चिंता वाढलीयावर्षी १ लाख ६१ हजार ९६५ विद्यार्थ्यांची कल चाचणी घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांचा कल लक्षात घेता, इंजिनीअरिंग व टेक्नालॉजीचा अभ्यासक्रम संचालित करणाऱ्या महाविद्यालयांची चिंता वाढली आहे. गेल्या चार वर्षात विभागासह राज्यभरात इंजिनीअरिंग अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे. २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात इंजीनिअरिंग अभ्यासक्रमाच्या २५ हजार जागेपैकी १२ हजाराहून अधिक जागा रिक्त राहिल्या आहेत. पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्यासुद्धा १८ हजाराहून अधिक जागा रिक्त राहिल्या आहेत.