लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समाज कल्याण विभागाने फ्री-शीपचे फार्म मंजूर केले नसल्याचे कारण देत तीन वर्षाचे शुल्क एकाच वेळी भरण्याचे निर्देश अभियांत्रिकी महाविद्यालयांनी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिले आहेत. अन्यथा परीक्षेला बसू न देण्याची व टीसी रोखण्याची धमकी या विद्यार्थ्यांना दिली आहे. त्यामुळे प्रचंड मानसिक दबावात असलेल्या विद्यार्थ्यांनी बुधवारी सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संजय पाटील, विश्वास पाटील, अॅड. स्मिता कांबळे, फुलझेले आदी कार्यकर्त्यांच्या नेतृत्वात या विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केले. विद्यार्थ्यांनी निवेदनाद्वारे दिलेल्या माहितीनुसार २०१६-१७ या सत्रामध्ये कॅप राऊंडद्वारे अल्पसंख्यांक गटातील सीटवर अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्ग, भटके विमुक्त विद्यार्थ्यांनी गुणवत्तेनुसार प्रवेश मिळविला. त्यानंतर शासनाच्या फ्री-शीप योजनेंतर्गत शुल्क प्रतिपूर्तीसाठी सर्व प्रमाणपत्रांसह ऑनलाईन अर्ज भरला आणि नियमानुसार उर्वरित शुल्कही जमा केले. त्यानंतर शासनातर्फे विद्यार्थ्यांची फ्री-शीप प्रतिपूर्ती होणे अपेक्षित होते पण तसे झाले नाही. आता तीन वर्ष लोटल्यानंतर महाविद्यालयांकडून अंतिम वर्षात असलेल्या विद्यार्थ्यांना ई-मेलद्वारे धमकीपत्र प्राप्त झाले आहे. समाज कल्याण खात्याने फ्री-शीप मंजूर केली नसल्याने विद्यार्थ्यांना हे तिन्ही वर्षाचे शुल्क भरावे लागेल, अन्यथा परीक्षेला बसता येणार नाही, असा इशारा या पत्रातून देण्यात आला. अशा प्रकारे संपूर्ण सत्राचे प्रत्येक विद्यार्थ्याला ४ लाख ११,२४० रुपये भरण्याचे निर्देश अभियांत्रिकी महाविद्यालयांनी दिले असल्याने विद्यार्थ्यांना धक्का बसला आहे. तीन वर्षे फ्री-शीपबाबत विद्यार्थ्यांना अंधारात ठेवून अंतिम वर्षी अचानक अशाप्रकारे धक्कादायक इशारा देणे म्हणजे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास देण्यासारखे असल्याची टीका विद्यार्थ्यांनी केली. समाज कल्याण विभाग व महाविद्यालयाच्या चुकीचा भुर्दंड विद्यार्थ्यांवर का, असा सवाल करीत विभागाने विद्यार्थ्यांच्या शुल्काची प्रतिपूर्ती करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
एकाच वेळी तीन वर्षाचे शुल्क भरण्याची विद्यार्थ्यांना धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2020 8:08 PM
समाज कल्याण विभागाने फ्री-शीपचे फार्म मंजूर केले नसल्याचे कारण देत तीन वर्षाचे शुल्क एकाच वेळी भरण्याचे निर्देश अभियांत्रिकी महाविद्यालयांनी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिले आहेत. अन्यथा परीक्षेला बसू न देण्याची व टीसी रोखण्याची धमकी या विद्यार्थ्यांना दिली आहे.
ठळक मुद्देअभियांत्रिकीचे विद्यार्थी मानसिक दबावात : समाज कल्याण कार्यालयात आंदोलन