नागपूर : नायलॉन मांजाने एका सहावर्षीय विद्यार्थिनीचा गळा कापल्याच्या घटनेला दोन दिवस उलटत नाहीत तोच सोमवारी सायंकाळी पुन्ही अशीच जीवघेणी घटना राणी दुर्गावती चौक परिसरात घडली. या घटनेत एका १८ वर्षीय सायकलस्वार विद्यार्थ्याचा गळा कापला गेला. यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल करून १६ टाके घालावे लागले.
या दुर्घटनेतील जखमी विद्यार्थ्याचे नाव शाहनवाज हुसैन मलिक असे असून ती ताजनगर येथील रहिवासी आहे. उत्तर नागपुरातील राणी दुर्गावती चौकातून सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास तो सायकलने आपल्या वडिलांच्या दुकानात जात असताना अचानकपणे मांजा आडवा आल्याने त्याचा गळा कापला गेला. यामुळे रक्तबंबाळ होऊन तो विव्हळू लागला. नागरिकांनी तातडीने धाव घेऊन त्याला एका खाजगी रुग्णालयात नेले. तिथे १६ टाके घालण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
काही कळायच्या आत 'त्या' चिमुकलीचा गळा कापला गेला; लागले तब्बल २६ टाके
शुक्रवारी सायंकाळी अशीच घटना टेका, फारुखनगर परिसरात घडली होती. आपल्या घराजवळील परिसरात खेळणाऱ्या ६ वर्षांच्या बालिकेचा गळा मांजाने कापला होता. तिला २६ टाके घालावे लागले होते. याशिवाय पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी एका व्यक्तीचे नाक मांजामुळे कापल्याचीही घटना घडली आहे. दिवसेंदिवस अशा घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.