नागपूर : राज्यभरातील पालकांमध्ये इंडिपेंडेंट इंग्लिश स्कूल असोसिएशन (ईसा) या संस्थेने काढलेल्या पत्रामुळे रोष व्यक्त होत आहे. संस्थेने काढलेल्या पत्रात वर्षभर गैरहजर विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात येणार नाही, असा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पालक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, हा प्रकार पालकांवर दबाव निर्माण करून फी वसूल करण्याचा असल्याचा आरोप पालकांच्या संघटनेने केला आहे.
ईसा या संघटनेचे प्रदेश अध्यक्ष राजेंद्र दायमा यांनी काढलेले हे पत्र आहे. त्यांचा दावा आहे की राज्यभरातील ४२०० शाळेचे संस्थाचालक या निर्णयाची अंमलबजावणी करणार आहेत. पत्रात त्यांनी स्पष्ट केले की, १५ मार्च २०२० पासून शाळा बंद आहेत. पण ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण सुरू असताना १५ ते २० टक्के विद्यार्थ्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देणे म्हणजे त्यांचे शैक्षणिक नुकसान केल्यासारखे होईल. संघटनेने या निर्णयाला विद्यार्थ्यांच्या हिताशी जोडून वर्षभर ऑनलाईन किंवा ऑफलाईन शिक्षणासाठी सतत गैरहजर असणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गाकरिता प्रवेश देणार नसल्याची भूमिका घेतली आहे. संघटनेच्या या पत्रामुळे नागपुरातील पालकांच्या संघटनांनी रोष व्यक्त केला आहे. हे पत्र पालकांकडून फी वसुलीसाठी दबाव निर्माण करणारे असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
- कोरोनाच्या काळात जिथे पालक जनतेला आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. शाळा फी वसुलीसाठी असल्या प्रकारचे दबाव निर्माण करून पालकांचा छळ करीत आहे. अशा शाळांवर, संघटनेवर राज्य सरकारने, शिक्षण विभागाने कठोर कारवाई करायला हवी.
योगेश पाथरे, राष्ट्रीय संयोजक, राष्ट्रीय शिक्षक पालक संघटन