नागपूर विद्यापीठ : अभ्यासक्रमनिहाय केंद्रांचे ‘क्लस्टर’ तयार करणार नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ऐनवेळी परीक्षा प्रवेशपत्र घेण्यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ होते. अनेकदा परीक्षा केंद्र अखेरच्या क्षणाला समजते. ही बाब टाळण्यासाठी विद्यापीठाकडून महाविद्यालयनिहाय परीक्षा केंद्र अगोदरच जाहीर करण्यात येणार आहे. याशिवाय परीक्षेच्या कामात सुसूत्रता आणण्यासाठी अभ्यासक्रमनिहाय परीक्षा केंद्रांचे ‘क्लस्टर’देखील तयार करण्याची तयारी सुरू आहे. हिवाळी परीक्षांपासून परीक्षा केंद्रांचे वाटप करण्यासाठी विद्यापीठातर्फे नवीन आराखडा तयार करण्यात येत आहे. आतापर्यंत परीक्षार्थ्यांची यादी, परीक्षा केंद्रांची क्षमता याच्या आधारावर परीक्षा प्रवेशपत्र तयार व्हायच्या काही काळ अगोदर परीक्षा केंद्र निश्चित करण्यात यायचे. त्यानंतर ही माहिती संबंधित केंद्रांकडे पाठविण्यात यायची. परंतु आता मात्र ही प्रक्रिया पूर्णपणे बदलण्यात येणार आहे. सध्या हिवाळी परीक्षांसाठी अर्ज भरणे सुरू झाले आहे. या अर्जांसोबतच महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची यादी येत आहे. ही यादी आल्यानंतर एखाद्या महाविद्यालयात कुठल्या अभ्यासक्रमाचे तसेच विषयाचे नेमके किती परीक्षार्थी आहे याचा अंदाज येत आहे. यावरून विद्यापीठातर्फे महाविद्यालयातील संख्या लक्षात घेता त्यादृष्टीने परीक्षा केंद्र देण्यात येणार आहे. कुठल्या महाविद्यालयाला कुठले परीक्षा केंद्र मिळणार आहे, याची यादी अगोदरच जाहीर करण्यात येईल, असे प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी सांगितले.(प्रतिनिधी) विषयनिहाय परीक्षा केंद्र हिवाळी परीक्षांपासून नागपूर विद्यापीठाकडून सर्व परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिकांची ‘आॅनलाईन डिलिव्हरी’ करण्यात येणार आहे. एका अभ्यासक्रमाचे विद्यार्थी विविध परीक्षा केंद्रांवर असतील तर तितक्या ठिकाणी प्रश्नपत्रिका ‘आॅनलाईन’ पाठवावी लागेल. त्यामुळे एका विषयाचे किंवा अभ्यासक्रमांचे विद्यार्थी ठराविक परीक्षा केंद्रांवरच कसे राहतील, याबाबत विद्यापीठाकडून अभ्यास करण्यात येत आहे. अभ्यासक्रमनिहाय केंद्रांचे ‘क्लस्टर’ तयार करण्यात येतील व शहरातील सर्व भागातील विद्यार्थ्यांना सोईची केंद्र यात निवडण्यात येतील, असेदेखील डॉ.येवले यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना अगोदरच कळणार परीक्षा केंद्र
By admin | Published: July 27, 2016 2:56 AM