नागपूर : विद्यार्थ्यांना गावांमध्येच आता कौशल्य व उद्योजकता प्रशिक्षण घेता येणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षेत्रातील एकूण ३७ ठिकाणी कौशल्य व उद्योजकता प्रशिक्षण केंद्र सुरू केले जाणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी ‘प्रधानमंत्री उद्योजकता कौशल्य विकास केंद्रां’चे ऑनलाईन उद्घाटन करतील.
ग्रामीण क्षेत्रात स्थानिक पातळीवरील रोजगार व स्वयंरोजगार निर्माण व्हावा. याकरिता ग्रामपंचायत असलेल्या गावांमध्ये प्रथमच ही केंद्र स्थापन करण्यात येत आहेत. ग्रामीण भागातील महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना या योजनेची माहिती देऊन त्यांचा या योजनेमध्ये सहभाग वाढविण्यासाठी नागपूर विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद आणि अधिसभा सदस्य देखील या उपक्रमात सहभागी होणार आहे.
‘प्रधानमंत्री उद्योजकता कौशल्य विकास केंद्र’ उद्घाटनाचा १९ ऑक्टोबरचा कार्यक्रम हा त्या त्या गावांमध्ये होणार आहे. महाविद्यालयाीन विद्यार्थ्यांना कार्यक्रम ठिकाणी घेऊन जाण्याच्या सूचना राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी तसेच विद्यार्थी विकास समन्वय अधिकारी यांना विद्यापीठाच्या वतीने देण्यात आल्या आहेत. विद्यापीठ परीक्षेत्रातील नागपूर जिल्ह्यामध्ये १३, वर्धा, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात प्रत्येकी ८ केंद्र सुरू केले जाणार आहे.
रोजगारक्षम युवक तसेच नवउद्योजक घडवण्याच्या दृष्टीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासह महाराष्ट्रातील ५११ गावांमध्ये त्या परिसराला उपयुक्त असे कौशल्य व उद्योजकता प्रशिक्षण देण्यासाठी ‘प्रधानमंत्री उद्योजकता कौशल्य विकास केंद्र’ महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत सुरु करण्यात येत आहेत.