आनंद डेकाटे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : तरूण हे प्रत्येक परिवर्तनात्मक कार्यासाठी उत्प्रेरक आहेत. मग ते संशोधन आधारित तंत्रज्ञानाची प्रगती असो, नाविन्यपूर्ण शोध, उद्योजक उपक्रम, स्टार्ट अप क्रांती, शाश्वत उपाय शोधण्याच्या मोहिमा, नागरी जबाबदाऱ्यांचे पालन आणि तत्सम प्रयत्न असो यामध्ये विद्यार्थ्यांची महत्त्वपूर्ण भूमिका महत्वाची आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनो, तुम्हीच भारताचे भविष्य आहात असे प्रतिपादन लेफ्टनंट जनरल चीफ ऑफ स्टाफ सदर्न कमांड मनजीत कुमार यांनी येथे केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात पदके व पारितोषिके वितरण सोहळा अंबाझरी रोडवरील गुरुनानक भवन येथे शुक्रवारी पार पडला. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे व कुलसचिव डॉ. राजू हिवसे हे व्यासपीठावर होते.
लेफ्टनंट जनरल मनजीत कुमार म्हणाले, विविध संस्कृती, विचारधारा, विश्वास प्रणाली हा आपला समृद्ध वारसा आहे. ही विविधता स्वीकारण्यातच भारतीय सामाजिक जडणघडणीचे सामर्थ्य दडलेले आहे. विद्यार्थ्यांना उद्देशून ते म्हणाले, आज आपला देश भविष्याविषयी तुमच्याकडून आत्मविश्वासपूर्ण आशावाद करीत आहे. तुमच्यासारखे तरुण- तरुणी मोठ्या संख्येने संधींची वाट पाहत आहेत. मोठे ध्येय ठेवा आणि नवीन संधी मिळविण्यासाठी सज्ज व्हा. चांगले नागरिक बनण्यासाठी आत्मविश्वासाने पुढे जा, तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा, प्रगतिशील आणि वैविध्यपूर्ण भारताच्या ध्येयासाठी तुमचे योगदान द्या, असेही आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक करताना प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे यांनी विद्यापीठाच्या वाटचाली विषयी माहिती दिली. संचालन डॉ. अमृता इंदूरकर यांनी केले.
दीक्षाभूमीच्या प्रणय पवार याने पटकाविले सर्वाधिक ७ सुवर्णपदके
डॉ. बाबासाहेब आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च दीक्षाभूमी नागपूर येथील विद्यार्थी प्रणय पवार याला एमबीए परीक्षेत सर्वाधिक ७ सुवर्णपदके, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय दीक्षाभूमी येथील ज्ञानेश्वर नेहरकर याला बीए एलएलबी (पाच वर्षीय अभ्यासक्रम) परीक्षेत ५ सुवर्णपदके व २ पारितोषिके, डॉ. मधुकरराव वासनिक पीडब्ल्यूएस कला व वाणिज्य महाविद्यालयातील मेघा पोटदुखे हिला एमए (मराठी) परीक्षेत ५ सुवर्णपदके व १ पारितोषिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभाग येथील बहि:शाल विद्यार्थी सचिन देव याला एमए (बुद्धिस्ट स्टडीज) परीक्षेत ५ सुवर्णपदके, डॉ. मधुकरराव वासनिक पीडब्ल्यूएस कला व वाणिज्य महाविद्यालयातील अजय खोब्रागडे याला एमए (डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा) परीक्षेत ४ सुवर्णपदके व १ पारितोषिक, स्वायत्त पदव्युत्तर रसायनशास्त्र विभागातील प्राची त्रिवेदी हिला ४ सुवर्णपदके, स्वायत्त पदव्युत्तर औषधी निर्माणशास्त्र विभागातील विद्यार्थिनी स्नेहा वट्टे हिला ३ सुवर्णपदके तर पदव्युत्तर शिक्षण विभागातील निखिल इंगळे याला ३ सुवर्णपदके प्रदान करण्यात आली. या सोहळ्यात संलग्नित महाविद्यालयातील एकूण १०१ प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांना १४२ सूवर्ण पदके, ८ रौप्य पदके व २५ पारितोषिके तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या स्वायत्त विभागातील ४४ विद्यार्थ्यांना ५३ सुवर्णपदके व एक पारितोषिके प्रदान करण्यात आले.