नागपूर : झाेपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या गरीब, गरजू विद्यार्थ्यांना आता इंग्रजी माध्यमाचे शिक्षण मिळेल. यासाठी मनपाने नागपूरच्या ६ विधानसभा मतदारसंघात बंद पडलेल्या ६ शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिमनंतर आता मध्य नागपुरातही इंग्रजी माध्यमांच्या शाळांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
शुक्रवारी गुरुपाैर्णिमेच्या पर्वावर मध्य नागपूरच्या स्व. गाेपालराव माेटघरे हिंदी उच्च प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचा प्रवेश साेहळा पार पडला. यावेळी उपस्थित महापाैर दयाशंकर तिवारी यांनी झाेपडपट्ट्यांमधील गरीब मुलांसाठी सुरू केलेले गुणवत्तापूर्ण इंग्रजी माध्यमाचे शिक्षण यशस्वी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी आमदार विकास कुंभारे, दिलीप दिवे, अधि. संजय बालपांडे, सरला नायक, अतिरिक्त आयुक्त दीपक कुमार मीणा, शिक्षाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर उपस्थित हाेते. उल्लेखनीय म्हणजे महापालिकेने आकांक्षा फाऊंडेशनच्या सहयाेगाने सहा विधानसभा मतदारसंघातील बंद पडलेल्या सहा शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाचे शिक्षण सुरू करण्याचा करार करण्यात आला आहे. गुरुवारी पश्चिम नागपूरच्या रामनगर प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला.
७ विद्यार्थ्यांना प्रवेश
गाेपालराव माेटघरे (खदान) शाळेत पहिल्या दिवशी ७ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. या शाळेत भारती विद्या मंदिराच्या एका विद्यार्थ्यांने प्रवेश घेतला. काेराेनाच्या प्रकाेपाने लाेक आर्थिक संकटात आहेत. अशा परिस्थिती मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. शाळेत केजी-१ पासून वर्ग १ पर्यंतचे प्रवेश देण्यात आले. सराेज पांडे यांना मुख्याध्यापक म्हणून नियुक्त करण्यात आले.