नागपूर : स्पर्धा परीक्षांच्या तोंडावर कुठलाही विचार न करता शहरातील अभ्यासिका, वाचनालय बंद केल्याने विद्यार्थ्यांची प्रचंड गैरसोय होत होती. अभ्यासिका व वाचनालये सुरू करा अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. महापालिकेने अखेर ५० टक्के क्षमतेच्या मर्यादेत अभ्यासिका आणि वाचनालय सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
अभ्यासिका बंद केल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याबाबतचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. याची दखल घेत मनपा प्रशासनाने अभ्यासिका व वाचनालये सुरू करण्याला परवानगी दिली आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावातही शहरातील विविध केंद्रांवर सुरू असलेल्या स्पर्धा परीक्षांसाठी बाजूच्या मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भातील शेकडो विद्यार्थी रोज दाखल होत आहेत. कोरोना नियमांचे काटेकोर पालन करून जेईई, इग्नू आणि अन्य परीक्षा सुरू आहेत तर दुसरीकडे करोनाचे कारण समोर करीत महापालिका प्रशासनाने शहरातील अभ्यासिका आणि ग्रंथालये बंद केली आहेत. या विरोधाभासी भूमिकेबाबत विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी होती. वर्षभरात चारदा रद्द झालेली राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा अखेर १४ मार्चला होणार आहे. याशिवाय रेल्वे, एनटीपीसी, आरोग्य विभागाच्या व इतर विभागाच्या परीक्षा आहेत. टाळेबंदीनंतर परीक्षेच्या तारखा जाहीर होताच विद्यार्थ्यांनी अभ्यासास सुरुवात केली. मात्र, कोरोना वाढल्यामुळे महापालिकेने अभ्यासिका आणि ग्रंथालये बंद केली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असल्याने अभ्यासिका सुरू कराव्या, अशी मागणी होत होती. त्यानुसार महापालिकेने अभ्यासिका, वाचनालय सुरू करण्याचा आदेश काढला आहे.