गोपालकृष्ण मांडवकर
नागपूर : रोगप्रतिकारशक्तीच्या वाढीसाठी बूस्टर डोससारखे काम करणाऱ्या रानभाज्या शतकानुशतके परिचयाच्या असल्या तरी, संकरित वाणाच्या मागे लागलेल्या कृषी विभागाला मात्र या अभ्यासाचा विसर पडला आहे. वनक्षेत्रालगतच्या आणि ग्रामीण भागातील जनतेने अद्यापही याचे ज्ञान पूर्वापार जतन करून वापर सुरू ठेवला असला तरी, निसर्गाने दिलेला हा बिनपैशाचा ठेवा समजून घ्यायला व पुढे न्यायला सरकारची यंत्रणा फारशी धजावलेली नाही.
हैदराबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन या संस्थेने रानभाज्यांचा अभ्यास केला असून, भाज्यांची शास्त्रीय नावे संकलित करून अभ्यास केला आहे. असे असले तरी स्थानिक विद्यापीठांनी हे संशोधन पुढे नेलेले नाही. राज्य शासनानेही यासाठी फार काही केलेले नाही. मागील वर्षी पहिल्यांदा रानभाजी महोत्सव भरविला गेला. कोकण विभागात यासंदर्भात जागृती अधिक आहे.
‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ हा प्रकल्प चालविणारे कुरखेडा (गडचिरोली) येथील डॉ. सतीश गोगुलवार म्हणाले, रानभाज्यांचा अभ्यास करून स्थानिक स्तरावर आम्ही संकलन केले आहे. मात्र मार्केटिंग म्हणावे तसे नाही. सरकारचेही याकडे फारसे लक्ष नाही.
नागपुरातील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील सहयोगी अधिष्ठाता डॉ. देवानंद पंचभाई म्हणाले, रानभाज्यांची आपण काही प्रमाणात माहिती गोळा केली असली तरी विद्यापीठाकडून वेगळा अभ्यासक्रम नाही. विद्यापीठाच्या कृषी विस्तार शिक्षण विभागाचे प्रा. रवींद्र वाघमारे यांनीही गडचिरोली विज्ञान केंद्राच्या माध्यमातून यासाठी मागील चार वर्षांपासून प्रयत्न चालविले आहेत.
कृषी अभ्यासक शांतिलाल कोठारी यांनीही रानभाज्यांवर बराच अभ्यास केला आहे. अनेक कृषी अभ्यासक यासाठी आपापल्यापरीने काम करीत असले तरी शासनाकडून त्यांना कसलेही प्रोत्साहन नाही.
...
कृषी विभाग शांतच
चंद्रपूर जिल्हा कृषी विभागाने आत्मा प्रकल्पाच्या माध्यमातून मागील वर्षी एक पुस्तिका प्रकाशित केली होती. नागपुरात कृषी विभागाने मागील वर्षी रानभाजी महोत्सव घेतला असला तरी, यंदा आत्मा प्रकल्पाकडे यंदा यासंदर्भात कसलीही माहिती नाही. रानभाज्यांवर मागील एक-दोन वर्षात पुस्तके प्रकाशित झाली आहेत. सिंधुदुर्ग येथील प्रा. विनायक ठाकूर, प्र. के. घाणेकर, मधुकर बापुलकर यांंची पुस्तके उपलब्ध आहेत. वरोरा येथील आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाने रानभाज्यांवर माहिती संकलित करून काही दिवसापूर्वी पुस्तिका प्रकाशित केली होती.
...
रानभाज्यांपुढील धोका
रानभाज्या वर्षभर मिळतील असे नियोजन असावे, अशी अपेक्षा असली तरी निसर्गत: ते शक्य नाही. स्थानिक भागात भाज्या मिळतात, त्यामुळे अध्ययन करणे अडचणीचे आहे. नैसर्गिकत: त्या उगवत असल्याने त्याची कृत्रिम लागवड करून घेणे अयोग्य ठरेल. त्यामुळे त्यांचा मुळ गुणधर्म नाहीसा होण्याचा धोका आहे. तणनाशकाच्या वाढत्या वापरामुळे भविष्यात त्या नष्ट होण्याचाही धोका आहे.
...
रानभाजी महोत्सवाचे यंदा नियोजनच नाही
महाराष्ट्रात असलेल्या कृषी विद्यापीठांनी यावर संशोधनात्मक अभ्यास करण्याची फारशी तसदी घेतलेली दिसत नाही. अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी विस्तार विभागाने रानभाजी संशोधन प्रकल्प राबविण्याचे नियोजन केले. मात्र प्रकल्प गडचिरोली विज्ञान केंद्राच्या पुढे फारसा पुढे सरकला नाही.
...