लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - धावत्या कारमधून शरीर बाहेर काढून स्टंटबाजी करणाऱ्या आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या तिघांना वाहतूक शाखेच्या पोलिसांनी दणका दिला. त्यांच्याविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आली. विशाल रामलाल राठोड (रा. आदर्श कॉलनी, त्रिमूर्तीनगर), नागेश नरेश जोगेकर (रा. आनंदनगर, जयताळा) आणि अमोल बबनराव काकडे (रा. त्रिमूर्तीनगर) अशी या आरोपींची नावे आहेत. २८ जुलैला दुपारी १२ वाजता आरोपी विशाल राठोडच्या एमएच ३१ - ईए - ३६०३ क्रमांकाच्या स्वीफ्ट कारमधून मिहानमधील डब्ल्यू बिल्डिंगमध्ये पोहोचले. तेथे कारची स्टंटबाजी आरोपींनी सुरू केली. एक आरोपी वेगात धावत असलेल्या कारवर उभा झाला. ते पाहून रस्त्याने जाणाऱ्यांच्या अनेकांच्या काळजाची धडधड वाढली होती. विशेष म्हणजे, आरोपींनी त्यांचे ते धोकादायक स्टंट स्वत:च धावत्या कारमधून स्वत:च्या मोबाइलमध्ये कैद केले. हा व्हिडिओ आरोपी जागेकर याने इंस्टाग्रामवर अपलोड केला. त्याची माहिती कळताच वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांनी त्याची गंभीर दखल घेतली. त्यांनी लगेच कारच्या नंबरवरून आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार, वाहतूक शाखेचे निरीक्षक अमित डोळस, सहायक निरीक्षक जॉन ॲन्थोनी सॅम्युअल, हवालदार शरद, अजय, नायक तराळे, नितेश, आरती यांनी तपास सुरू केला. त्यानंतर आरोपी राठोड, जागेकर तसेच काकडे विरुद्ध सोनेगाव पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करून त्यांना कोठडीची हवा दाखविण्यात आली.
---