नागपूर : अंबाझरी पोलिस ठाण्यांतर्गत चारचाकी वाहनांतून हुल्लडबाजी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रकरण ताजेच असताना अजनीत आणखी एक ‘स्टंटबाजी’ समोर आली आहे. चक्क चालत्या जीपमधून खाली उतरून स्टंट करणाऱ्या एका आरोपीला शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. इन्स्टाग्रामवरील ‘रील’मुळे हा प्रकार समोर आला असून, आरोपी गजेंद्रसिंह राठोर याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एक व्यक्ती लाल रंगाच्या एमएचडब्ल्यू ९००८ या जीपवर स्टंटबाजी करत असल्याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला. तो व्हिडीओ नागपूर पोलिसांच्या वाहतूक शाखेला पाठविण्यात आला. मॉडिफाईड करण्यात आलेल्या जीपमध्ये संबंधित व्यक्ती एकटाच दिसून येत होता. चालत्या जीपमधून उतरून तो स्टंट करत असल्याचे व्हिडीओत दिसून आले. त्याच्या अकाऊंटवर इतरही स्टंट्स होते. त्यात (एमएच ४९, बीएल ४३११) या बुलेटचादेखील फोटो होता. त्यावरून पोलिसांनी गजेंद्रसिंह विजेंद्रसिंह राठोर (साकेतनगर, धारीवाल ले-आऊट, पार्वतीनगर) याचा शोध लावला. त्याला विचारणा केली असता, त्याने अजनीतील जुना कंटेनर डेपो येथे स्टंट केल्याची कबुली दिली. त्याने व्हिडीओच्या वेळी जीपवर नंबरप्लेटदेखील लावली नव्हती. तसेच जीपच्या मूळ बॉडीत फेरफार केला होता. त्याने चालत्या जीपमधून उतरत इतरांच्या जिवाला धोका उत्पन्न केला. या सर्व बाबी लक्षात घेता पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सोशल मीडियामुळे वाढला धोका
नागपुरात दुचाकी किंवा कारच्या माध्यमातून स्टंटबाजी करणे हा प्रकार नवा नाही. मात्र, काही दिवसांपासून ‘सोशल मीडिया’मुळे अशा गोष्टी वाढल्या आहेत. असे करत असताना इतरांचा जीव धोक्यात येतो याची जाणीवदेखील राहत नाही. पोलिसांकडून काही दिवसांसाठी मोहीम राबविण्यात येते. मात्र, त्यानंतर स्थिती ‘जैसे थे’ होते असे चित्र आहे.
अनेकदा कारवाया, मात्र वचक नाहीच
पोलिसांकडून स्टंटबाजांवर अनेकदा कारवाया करण्यात आल्या. मात्र, तरीदेखील अतिउत्साही तरुणांवर वचक बसलेला नाही. ऑगस्ट २०२१ मध्ये स्टंटबाजी करणाऱ्या चार तरुणांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर उड्डाणपुलावरदेखील धोकादायक स्टंटबाजी दिसून आली. मात्र, नाममात्र कारवाई झाली.
रात्री सुरू होते हुल्लडबाजी
शहरातील काही विशिष्ट भागांत रात्र झाल्यावर कारमधून बाहेर निघत, कारबाहेर डोकावत किंवा दुचाकीवर हुल्लडबाजी करणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. प्रामुख्याने प्रतापनगर, अभ्यंकरनगर, आयटी पार्क, धरमपेठ, बजाजनगर, वंजारीनगर, सदर, ऑरेंज स्ट्रीट, वर्धमाननगर, उमरेड मार्ग, मेडिकल चौक या भागात असे प्रकार अनेकदा दिसून येतात. मात्र, पोलिसांकडून गस्त वाढविण्यात आलेली नाही. अनेक तरुण तर दारू पिऊन असे प्रकार करताना दिसून येतात.