वसीम कुरैशीलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विशाखापट्टणम येथे स्टाइरीन गॅस लीकमुळे प्रभावित झालेल्या नागरिकांना तब्बल वर्षभर आरोग्य तपासणी करावी लागणार आहे. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थान (नीरी) व आंध्र प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळ (एपीपीसीबी) यांनी यासंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.या घटनेनंतर नीरीच्या पाच शास्त्रज्ञांचे पथक विजागला पोहचले. त्यात डॉ. के. कृष्णमूर्ती, जी. के. खडसे व के. व्ही. जॉर्ज यांच्यासह दोन कनिष्ठ शास्त्रज्ञांचा समावेश आहे. ते १२ मे रोजी नागपुरात परत येण्याची शक्यता आहे. या पथकासह एपीपीसीबीच्या तज्ज्ञांनी वेंकटपुरम, वेंकटाद्रीनगर, नंदमुरीनगर, पिदबांबा कॉलनी व बीसी कॉलनी या प्रभावित क्षेत्रांमध्ये जमिनीपासून १.५ ते ४.५ फूट उंचीपर्यंत सर्वेक्षण केले. दरम्यान, केवळ एकाच घरामध्ये १.७ पीपीएम स्टाइरीन आढळून आले. मोकळ्या परिसरात व रोडवरील घरांमध्ये हा गॅस दिसून आला नाही.अशी आहेत मार्गदर्शक तत्त्वे१ - घरातील धूळ सॅनिटायझरने स्वच्छ करावी.२ - फ्रिजमध्ये ठेवलेल्या वस्तूंचे सेवन करू नये. प्राण्यांनाही देऊ नये.३ - वायुबंद वस्तू सॅनिटाईझ करून उघडाव्या.४ - सर्व भांडी स्वच्छ धुवावी.५ - घरात रुम फ्रेशनरऐवजी अगरबत्ती व धूपचा वापर करावा.६ - प्रभावित क्षेत्रातील भाजीपाला सेवन करू नये.७ - लहान झाडे उपटून फेकून द्यावीत.८ - दुध व दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करू नये.९ - मोकळ्या जागेतील पाणी वापरू नये.१० - चार चाकी वाहनांना स्वच्छ व व्हेंटिलेट करावे.