वस्त्या जलमय : दिवसभरात २६.१ मिमी.पाऊस नागपूर : मागील दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर सोमवारी मध्यरात्रीपासून उपराजधानीत पुन्हा पावसाची रिमझिम सुरू झाली. मंगळवारी दिवसभर पाऊस बरसला. यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. सायंकाळी ५.३० वाजतापर्यंत नागपुरात एकूण २६.१ मिमी. पावसाची नोंद झाली. रात्रीपासून सुरू असलेल्या या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी भरले आहे. शिवाय रस्त्यांवर सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. जुलै महिन्यात नागपूर विभागात सरासरी १५९.६ मिमी. पाऊस होतो. परंतु यावर्षी १२ जुलै पर्यंत विभागात १६५ मिमी. पाऊस झाला आहे. यामुळे विभागातील बहुतांश नद्या व नाले तुडुंब भरू न वाहत आहेत. शिवाय जलाशयातील पाण्याची पातळी वाढली आहे. १२ जुलै रोजी एकाच दिवशी विभागात ३२ मिमी. पाऊस पडला आहे. मागील २४ तासात नागपूर जिल्ह्यातील पावसाचा विचार करता नागपूर ग्रामीणमध्ये ६.७ मिमी, कामठी ४.४, हिंगणा ३.१, रामटेक १३.२, पारशिवनी २, मौदा १७.९, काटोल ५.२, नरखेड १५.८, सावनेर २०.१, कळमेश्वर ६.६, उमरेड ८.४, भिवापूर ६.३ व कुही तालुक्यात २.२ मिमी पाऊस झाला आहे. हवामान विभागानुसार उद्या बुधवारीही नागपूर विभागात संततधार पाऊस सुरूच राहण्याची शक्यता आहे. मात्र यानंतर पावसाचा जोर कमी होणार असल्याचेही संकेत देण्यात आले आहेत.
उपराजधानी भिजली
By admin | Published: July 13, 2016 3:26 AM